चाकण : खेड तालुक्यातील कडूस क्रिकेट अकॅडमी व मंचर क्रिकेट अकॅडमी यांच्यात झालेल्या मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यात कडूस क्रिकेट अकॅडमीने दोन विकेटने सामना जिंकून पाच सामन्याच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय संपादन करून, विजयी सुरुवात केली. ऋत्विकराज मांडेकर याच्या 63 धावांच्या जोरावर व संकल्प शिंदेच्या 31 धावांच्या समावेशाने दणदणीत विजय संपादन केला. मंचर क्रिकेट अकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेऊन, 18 षटकात सर्व बाद 127 धावा केल्या, सौरभ कडदेकर याने सर्वोच्च 38 धावा केल्या. परंतू संघाचे सर्वच खेळाडू 18 षटकात बाद झाल्याने धावसंख्या चांगली उभारता आली नाही.
…पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी
विजयासाठी 127 धावांच्या आव्हानासमोर कडूस क्रिकेट अकॅडमी आक्रमक सुरुवात केली होती. परंतु पाच षटकात 13 धावांत पाच गडी बाद झाल्याने कडूस क्रिकेट अकॅडमी अडचणीत आली होती. मात्र, ऋत्विकराज मांडेकर याने तडाकेबंद फलंदाजी करत आपल्या वेगवान खेळीत 11 चौकार खेचत 39 चेंडूत 63 धावा करून सामनाविराचा पुरस्कार पटकवला. सलामीला आलेल्या रोहित फडतरे 1 धाव, विशाल घाटे याने 4 करत माघारी फिरले, त्यानंतर आलेल्या ललीत मुसळे यांनाही जास्त वेळ खेळता आले नाही. त्यानंतर एकापाठोपाठ एक बाद होत कडूस क्रिकेट अकॅडमीचा संघ अडचणीत आला होता. परंतु संकल्प शिंदे याने पाच चौकारांसह 31 धावा करून, ऋत्विकराज मांडेकर याला चांगली साथ देऊन अखेर विजय संपादन केला. कडूस क्रिकेट अकॅडमी संघाकडून प्रथम गोलंदाजी मंचर संघाचे सर्व गडी बाद केले. संकल्प शिंदे याने 4 षटकात 16 धावा देऊन 4 गडी बाद केले. तर ललीत मुसळे याने 5 षटकात 27 धावा देत 3 बळी घेतले.