कडूस : गेल्या काही दिवसांत पडणार्या संततधार पावसाने कडूस परिसरातील खरीप पिकांना पोषक वातावरण तयार झालेले आहे. कडूस परिसरात एकूण 2309 हेक्टर क्षेत्र खरीप हंगाम लागवडीसाठी उपलब्ध असून बहुतांश क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या भागातील जलस्रोतही तुडुंब भरलेले असून त्याचा फायदा रब्बी हंगामातही होणार असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. डोंगर आणि रानातही पावसामुळे गवताची वाढ चांगली झालेली असून प्रमुख जोडधंदा असणार्या दुग्धव्यवसायासाठी पाळल्या जाणार्या दुभत्या जनावरांच्या हिरव्या चार्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
पानमंदवाडी, गोलापूर आणि ढमाले शिवार या ठिकाणी सोयाबीन आणि बाजरी या पिकांचे पथदर्शी प्रकल्प खरीप हंगामात राबविले असून याकामी या भागातील महिला बचत गटांची मदत घेण्यात आली आहे अशी माहिती कडूस विभागच्या कृषी सहाय्यक मोहिनी सावंत यांनी दिली.
मृदा आरोग्य पत्रिका अभियान
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती करण्यासाठी शेतकर्यांना मार्गदर्शन केले जात आहे. पंतप्रधान मृदा आरोग्य पत्रिका अभियानांतर्गत शेतकर्यांच्या शेतातील माती परीक्षण केले जात आहे. खरीप हंगामात खते व बी-बियांनावर शेतकर्यांच्या झालेल्या खर्चाच्या 50 टक्के रक्कम अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी शेतकर्यांनी आधार कार्ड व बँक खाते क्रमांक कृषी विभागाकडे द्यावीत. या वर्षीचा हंगाम चांगला आहे अशी माहिती खेड तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी दिली.