मुरबाड । कडोंमपा प्रभाग क्रमांक 4 मधील बारावे, गोदरेज पार्क, नीरज सिटी, गोदरेज हिल, मोहन पार्क, माधव संसार, माधव संकल्प, माधव सृष्टी आणि वसंत व्हॅली या परिसरातील परिवहन बस सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंद करण्यात आली होती. भारतीय जनता पार्टीचे ठाणे पालघर विभागीय चिटणीस अशोक मिरकुटे यांनी कडोंमपाला अनेक वेळा या सेवा सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. कडोंमपातर्फे लेखी आश्वासन देण्यात आले असले तरीही वरील सेवा आजतागायत बंद आहेत. त्या ठिकाणी खासगी 8 ते 10 बसेस धावत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, कल्याण स्टेशन परिसरात खासगी बसेस थांबवल्या जातात. यातून रोज लाखो रुपयांची उलाढाल खासगी बसेसना होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच वाढीव चार्ज घेतले जात असल्यामुळे खासगी बस सेवांना प्रवासी व नागरिक हैराण झाले आहेत. तसेच या परिसरात लोकसंख्या 10 ते 15 हजार इतकी लोकसंख्या असून बहुतांशी नागरिक बसेस च्या सेवेवर अवलंबून आहेत.
परिवहन उपक्रमामुळे शेकडो बसेस उभ्या असल्याचे दिसत आहे. कडोंमपा ने सुरु केलेल्या बसेस बंद का झाल्या आहेत याचा विचार करून वर नमूद केलेल्या परिसरात बंद करण्यात आलेल्या सेवा पुन्हा सुरु कराव्यात जेणेकरून महा पालिकेच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल अशी मागणी अशोक मिरकुटे यांनी केली आहे. जर बसेस चालू झाल्या नाही तर कडोंमपाच्या कार्यालयासमोर वरील परसातील नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे असे लेखी दिलेल्या निवेदनात अशोक मिरकुटे यांनी म्हटले आहे. सदरचे निवेदन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- महाराष्ट्र राज्य, कडोंमपा आयुक्त, परिवहन व्यवस्थापक, भिवंडी लोकसभा मतदारसंघ खासदार कपिल पाटील, आरटीओ- बिर्ला कॉलेज कल्याण या सर्वांना देण्यात आले आहे.