कणमध्ये चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू

0

नादुरुस्त कारमध्ये आढळला मृतदेह; अपघात की घातपात?
चाकणमधील खराबवाडी येथील दुर्देवी घटना

चाकण : गेल्या दोन महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या मारुती कंपनीच्या इस्टीम कारमध्ये पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह आढळल्याने पंचक्रोशीत प्रचंड खळबळ उडाली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी (ता.खेड) गावाच्या हद्दीत सोमवारी (दि.2) सायंकाळी सात वाजेच्यादरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अद्याप काहीच धागेदोरे हाती लागले नसून, पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी नोंद केल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली. करण अखिलेश पांडे (वय 5 वर्षे, सध्या रा. खराबवाडी) असे दुर्देवी चिमुरड्याचे नाव आहे. त्याचे वडील अखिलेश सियाराम पांडे (वय 35) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा दुर्देवी प्रकार घातपात असावा, अशी शंका व्यक्त केली जात होती.

बंद कारमध्ये चिमुकला गेला कसा?
पोलिसांच्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशातून आलेले अखिलेश पांडे हे आपल्या कुटुंबीयांसमवेत खराबवाडी येथे खोली घेऊन भाड्याने राहत आहेत. मोशी जकातनाक्याजवळ एका खासगी ठिकाणी ते नोकरीला असून, नोकरीच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबीयाचा उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांचा मुलगा करण हा सोमवारी (दि.2) सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घराजवळ मुलांबरोबर खेळत होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो घरी न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. राणूबाईमळा नाणेकरवाडी ते जंबूकर वस्तीमार्गे निघोजे रस्त्याकडे जाणार्‍या रोडच्या कडेला बजाज कंपनीच्या मोकळ्या जागेत गेल्या दोन महिन्यापासून मारुती कंपनीची एस्टीम कार (एम.एच.12 डब्लू. 8447) नादुरुस्त अवस्थेत उभी होती. त्या गाडीत डोकावून पाहिले असता, करण हा गाडीतील पाठीमागील सीटवर निपचित पडलेला दिसत होता. गाडीच्या कारचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला असता, चालकाच्या बाजूचा दरवाजा लॉक नसल्याने तत्काळ उघडला. पुढील बाजूकडून गाडीत घुसून मागील सीटवर पाहिले असता करण पांडे या पाच वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह मिळून आला. मात्र, या घटनेचे धागेदोरे अद्याप हाती आले नसून, याबाबतची माहिती पोलिसांना कळविताच घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या धक्कादायक प्रकाराने चाकणमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. येथील पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मात्र, सूतावरून स्वर्ग गाठावा लागणार आहे.

उन्हामुळे डोके, मांडीची त्वचा सोललेली!
हा मृत्यू गुदमरून झाला असला तरी हा अपघात आहे की घातपात आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामुळे वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यासाठी शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. दुपारी बारापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत भरउन्हात तापलेल्या कारममध्ये बालक अडकल्याने व त्यास बाहेर येता न आल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी दुपारी 12 ते सायंकाळी पावणेसहाच्यादरम्यान घडली. कडक उन्हामुळे करणच्या मांडी आणि डोक्याचे त्वचाही सोलली गेली होती. मृत करणची आई सुशीलादेवी ही लहान बाळाला पोलिओ लसीकरणाचा डोस देण्यासाठी दवाखान्यात गेली होती. यावेळी करण हा इतर मुलांसोबत खेळत होता. दुपारी दोन वाजता आई घरी आल्यानंतर तिने सगळीकडे करणचा शोध घेतला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुशीलादेवी व वस्तीवरील इतर लोक शोध घेताना मुलगा करण हा नादुरुस्त ईस्टीम कारमध्ये मागील सीटवर पडलेला आढळून आला. पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुभाष पवार व हवालदार साळुंके पुढील तपास करीत आहेत.