कत्तलखाने बंद करण्यासाठी कठोर पावले उचला

0

धुळे । गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा तसेच गोहत्याबंदीचा कायदा असतांना सुरु असलेले कत्तलखाने बंद करण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत, या मागणीचे निवेदन द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक रविंद्र शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. धुळे शहरातील विविध विकास कामांचा लोकार्पण व शुभारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि 17 रोजी धुळ्यात आले होते. पांझरानदी पात्रात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी हे निवेदन देण्यात आले. प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या सभेची सुरुवात गोमाता पूजनाने झाली.

स्वतंत्र गोमंत्रालयाची स्थापना करावी
या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संस्कृतीचे तसेच अध्यात्माचे मूळ गोमातेत आहे. म्हणूनच केंद्र सरकारने गोहत्याबंदीचा कायदाही केला आहे. राज्यशासनाने गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देवून गोहत्याबंदीचा कायदा कठोरपणे राबवावा. तसेच कायदा असतांना कत्तलखाने चालविणार्यांवर कठोर कारवाई करावी, गोमातेच्या शेणापासून मिथेलवायु तयार करुन त्याचा पेट्रोल व डिझेलला पर्यायी इंधन म्हणून वापरासाठी प्रयत्न व्हावा, स्वतंत्र गोमंत्रालयाची स्थापना करावी, दहा वर्षातील बालकांना अंगणवाडी, बालवाड्यांमध्ये पोषण आहार म्हणून गायीचे दुध देण्यात यावे, गायींच्या चार्यासाठी गावागावात आरक्षीत कुरण असावे, गोहत्या करणार्‍याला मनुष्य हत्या करणार्‍याप्रमाणे कठोर शिक्षा व्हावी, शेतकर्यांना समृध्द करण्यासाठी देशी गायींच्या जातीचे संवर्धन करावे आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदनावर रविंद्र शेलार यांच्यासह उपाध्यक्ष तथा नगरसेवक अमोल (बंटी) मासुळे, मुकेश थोरात यांची नावे असून मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाचा सकारात्मक विचार करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे रविंद्र शेलार यांनी कळविले आहे.