कत्तलीसाठी गुरांची वाहतूक; रावेरला नाकाबंदीत डाव फसला

0

रावेर । कत्तलीच्या उद्देशाने गुरांची वाहतूक होत असतांना रावेर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत 39 गुरांची सुटका करण्यात आली तर तीन गुरांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मध्यप्रदेशातील पन्ना येथील तिघांना अटक करण्यात आली असून गुरांची जळगावच्या गोशाळेत रवानगी करण्यात आली. रावेर पोलिसांनी मंगळवारी पहाटे नाकाबंदी केली असता दहाचाकी ट्रक (क्र. एम.पी. 09 के.ए. 9431) मध्ये गुरांची कोंबून वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. संबंधितांकडे गुरे वाहतुकीचा कुठलाही पुरावा नसल्याने राजेशकुमार साहू, मेहबूबखान चाँदखान, करीमखान खयालीखान (पन्ना, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. तपास उपनिरीक्षक दीपक ढोमणे करीत आहे.

भुसावळात घरफोडी; 58 हजारांचा ऐवज लंपास
शहरातील नॉर्थ कॉलनी भागातील रेल्वे कर्मचार्‍याच्या बंद घरात चोरट्यांनी घरफोडी करत पोलिसांच्या गस्तीला आवाहन दिले. आठ हजारांच्या रोकडसह 58 हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुध्द मुकेशकुमार राजाराम मीना यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 9 ते 11 दरम्यान मीना हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील आठ हजारांची रोकड, 10 ग्रॅमचे मणी-मंगळसुत्र, 12 हजारांचे पाच ग्रॅम वजनाचे टॉप्स, पाच हजार रुपये किंमतीच्या दोन ग्रॅम सोन्याच्या बाल्या, दोन हजार 500 रुपये किंमतीचे एक ग्रॅम वजनाचे पदक, दोन हजार 500 रुपये किंमतीचे एक ग्रॅम वजनाचे ओमकान, दोन हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या तोरड्या असा एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. तपास पोलीस उपनिरीक्षक के.टी.सुरळकर करीत आहे.