वरणगाव येथून 62 गोवंश, ट्रक, मोबाईल असा 21 लाख 24 हजाराचा मुद्देमाल ताब्यात ; दोन संशयितांना ताब्यात घेत गुन्हा दाखल ; 5 गोवंश मयत
जळगाव- वरणगाव शहरातील ईमाम कॉलनीत एक पत्र्याचे शेड तयार करून त्याठिकाणी गोवंशाची जनावरे आणून टप्प्याटप्प्याने ट्रकमधूनप कत्तलीसाठी पाठविले जात असल्याच्या रॅकेटचा शुक्रवारी रात्री एलसीबीच्या पथकाने पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रकसह, 62 गोवंशसह तसेच संशयितांनासह 21 लाख 24 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. 62 गोर्ह्यांची कुसूंबा येथील अहिंसा तीर्थ गोशाळेत रवानगी करण्यात आली असून 5 गोवंश मयत झाल्याने नुकसान झाले आहे.
पोलीस वाहन पाहताच संशयित चारचाकीतून पसार
वरणगाव शहरात ईमाम कॉलनी भागात ईमाम कॉलनीच्या बोर्डाजवळ मोकळ्या जागेसमोरील शेख वसीम शेख यासीन व बशीर कुरेशी उर्फ चढ्ढा दोन्ही राहणार वरणगाव ता.भुसावळ यांच्या मालकीचे व कब्जातील पत्राचे शेडमध्ये एक ट्रक उभा असून त्याट्रक मध्ये बेकायदशीररित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशातील सुमारे 50 ते 60 जनावरे कोंबून भरुन आणली असल्याची माहिती पोलिसांना शुक्रवारी सायंकाळी मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, मुक्ताईनगरचे उपविभागीय अधिकारी संजय देशमुख यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, सपोनि सागर शिंपी, सपोनि सारिका कोडापे, हवालदार अनिल इंगले, रविंद्र गिरासे, सुनिल दामोदरे, दत्तात्रय बडगुजर, रविंद्र चौधरी, संतोष मायकल, रमेश चौधरी, मिलींद सोनवणे, किरण चौधरी अशांनी वरणगाव येथे गाठले व सापळा रचला. याठिकाणी पोलीस वाहन पाहताच संशयित चारचाकीतून पसार झाल्याने ते हाती लागले नाही.
गोवंश वाहतुकीसाठी ट्रकची दोन भागात विभागणी
ईमाम कॉलनी भागात शेख वसीम शेख यासीन, बशीर कुरेशी उर्फ चढ्ढा यांचे मालकीचे व कब्जातील लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी जनावरे वाहतुकीचा कोणताही प्राधिकृत प्राधिकार्याने दिलेला परवाना नसतांना ट्रक चालक व मालक शेर मोहम्मद जाकीर हुसेन रा. कसाबवाडा मस्जिद, वडजाई रोड, धुळे यांच्या मदतीने ट्रक क्रमांक एमएच.18.बीजी.0315 मध्ये ट्रकच्या अंतर्गत दोेन भागात विभागणी करुन गोवंशांची वाहतूक केली जात होती.
गोवंशच्या प्रेमापोटी आर.सी.बाफनांनी रात्रीच गाठले वरणगाव
ट्रकमध्ये 67 गोर्हे ठेवण्यात आले होते. वाहतुकीदरम्यान त्यांनी उठून उभे राहु नये म्हणून प्रत्येक गोर्ह्यांचा एक पाय व मान एकाच दोरीने बांधून ट्रकमध्ये क्रुरतेने कोंबून ठेवले होते. यामुळे वाहतुकीदरम्यान 5 गोर्ह्याचा मृत्यू झाला. त्यापैकी 62 जिवंत असल्याने त्यांची रवानगी कुसूंबा येथील गोशाळेत करण्यात आली आहे. चौघांविरुध्द महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमचे कलम 5, 5(अ), 5(ब), 9, 11, प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11(ड), (ई), (फ), मोटार वाहन कायदा व भा.दं.वि.कलम 429 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गोवंशच्या प्रेमापोटी शाहाकार प्रणेते रतनलाल बाफना यांनी रात्रीच 8 वाजता वरणगाव गाठले. डोळ्यादेखत गोवंशची गोशाळेत रवानगी केली.