कत्तलीसाठी जाणार्‍या 15 म्हशींना भुसावळात जीवदान

0

भुसावळ- बेकायदा गुरांची वाहतूक करून त्या कत्तलीसाठी नेणार्‍या मध्यप्रदेशातील दोघांच्या मुसक्या बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या असून 15 म्हशींची सुटका करीत त्यांना जळगावच्या गो शाळेत रवाना करण्यात आले. बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजता ही कारवाई केली. राष्ट्रीय महामार्गावरून औरंगाबादकडे कत्तलीच्या उद्देशाने 15 म्हशी ट्रक (एम.एच. 18 एए 7030) मधून नेल्या जात असताना सोमवारी रात्री पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी खडका चौफुलीवर ट्रक थांबवला. चालकाकडे गुरे वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याने अबरार खान व रंजीम खान चिराग खान (रा. बलखड, खरगौन, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. हवालदार छोटू वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांही आरोपींविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुरांची निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.