कथित ईव्हीएम हॅकिंगचे आरोप कॉंग्रेसच्या सांगण्यावरून-भाजप

0

नवी दिल्ली – कथित ईव्हीएम हॅकिंग प्रकरणावरून लंडनमधील पत्रकार परिषद ही काँग्रेसच्या सांगण्यावरून आयोजित करण्यात आली होती असे गंभीर आरोप भाजपने कॉंग्रेस व कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केले आहे. लंडनमधील पत्रकार परिषदेचे आयोजक आशीष रे यांचे काँग्रेसशी संबंध असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भेटही घेतली होती, असा आरोप भाजपाने केला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ईव्हीएम हॅकिंग प्रकरणी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

काँग्रेसने या प्रकरणातून देशातील ९० कोटी मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अपमान केला असून, देशाला जगात बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याचे आरोप भाजपने केले आहे. अशा आरोपबाजीमधून काँग्रेस 2019 साली होणाऱ्या पराभवाचे कारण शोधत आहे, असा टोलाही रवीशंकर प्रसाद यांनी लगावला आहे.