पिंपळनेर । पुणे विद्यापीठाच्या कथित गैरकारभाराविरूध्द अ.भा.विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळावा म्हणून गेल्यावर्षी वर्षी उपोषण आंदोलन करणार्या सागर सुभाष रायते (वय 21) या महाविद्यालयीन तरूणाने लाटीपाडा धरणाजवळ शेतालगतच्या नाल्यातील बाभळीच्या झाडास नॉयलान दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेची पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. मात्र एका गरीब घरातील व हुषार तरूण म्हणून ओळखला जाणार्या सागरने अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबतची चर्चा सुरु आहे.
सागरची आत्महत्या
सागर रायते हा मुळचा न्याहाळोद येथील रहिवासी होता. आई भाऊ यांचेसह मामाच्या गावात पिंपळनेर येथे राहात होता. त्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. ही घटना सकाळी 7 वाजेपूर्वी घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एमएसस्सीचा विद्यार्थी
सागर हा पुणे विद्यापीठात एमएसस्सीच्या प्रथम वर्षाला होता. तो पुणे येथे द्वितीय वर्षाचे शिक्षणासाठी जाणार होता. सागरने झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. पुणे विद्यापीठाच्या गैरकारभाराविरूध्द अ.भा.विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळावा म्हणून सागरने उपोषण आंदोलन केले होते.