नवी दिल्ली । भारतात लष्कर विभाग हा विशेष जबाबदारीचा आणि आदराचा असा विभाग मानला जातो. त्यामुळे आता, या लष्करी विभागावर आणखी एक जबाबदारी टाकण्यात आली आहे. ही जबाबदारीमुळे त्यांच्याबाबत वाटणारा आदरही वाढणार आहे. लवकरच लष्करी जवानांच्या कदम तालने वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच वेळी लष्करी जवानांकडून दोन जनतेच्या हिताच्या गोष्टी पार पडणार आहेत.
भारतीय लष्कराच्या जवानांच्या कदम तालपासून निर्माण होणारी ऊर्जा विशेष प्रकारच्या बुटांच्या माध्यमातून एकत्र करून वीज तयार केली जाणार आहे. आयआयटी दिल्लीच्या वैज्ञानिकांना हे तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळाले आहे. विशेष म्हणजे दिल्लीत मेट्रो रेल्वे आणि फ्लायओव्हरवर वाहनांमुळे उत्पन्न होणार्या कंपनांद्वारेही वीज तयार करण्यात पहिले यश मिळाले आहे. सीमा आणि जंगलांच्या सुरक्षेदरम्यान आपल्या बुटांद्वारे तयार झालेल्या विजेपासून आवश्यक काम करता यावे म्हणून लवकरच हे विशेष बूट लष्कराच्या जवानांना उपलब्ध करून दिले जातील.
वीजनिर्मितीची प्रक्रिया
आयआयटी दिल्लीच्या सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल विभागाचे वैज्ञानिक आणि प्रा. सुरेश भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली पीएचडी स्कॉलर अभिषेकने हे तंत्र विकसित केले आहे. अभिषेकने सांगितले की, त्यात पिझोइलेक्ट्रिक एनर्जी हार्वेस्टिंगचा वापर करण्यात आले आहे, त्याला शू एनर्जी हार्वेस्टिंगचे नाव देण्यात आले आहे. त्यासाठी एनर्जी हार्वेस्टर सेन्सर बनवण्यात आले आहे, ते बुटाच्या आत फिट होईल. त्याच्यासोबत शू कॅपॅसिटरही लावण्यात आले आहे. चालण्याच्या वेळी पायाचा पंजा आणि टाच जमिनीला स्पर्श करतील तेव्हा सेन्सर त्याचे रूपांतर विजेत करून कॅपॅसिटरमध्ये एकत्र करून वीज निर्मिती करेल.
वाहनांच्या कंपनांद्वारेही वीजनिर्मिती
वैज्ञानिकांच्या या चमूने फ्लायओव्हरवर वाहनांच्या कंपनांद्वारे याच धर्तीवर वीज तयार करण्याचेही तंत्र विकसित केले आहे. त्यावर अंतिम संशोधन सुरू आहे. अर्थात, पहिले यश मिळाले आहे. याच संशोधनाची चाचणी मेट्रो ट्रेनच्या कंपनांत करायची आहे. मेट्रो ट्रेन एलिव्हेटेड कॉरिडॉर किंवा फ्लायओव्हरमध्ये पिझोइलेक्ट्रिक एनर्जी हार्वेस्टिक फ्रॉम ट्रॅफिक इन्ड्युस्ड ब्रीज व्हायब्रेशन्स असे नाव देण्यात आले आहे. त्यात वर सेन्सर लावलेला असेल, तर खाली कॅपॅसिटर असेल. या कॅपॅसिटरमध्ये एकत्र होणार्या विजेपासून वाहतुकीचे दिवे, पथदिवे लागू शकतात. त्यामुळे आता वीज निर्मितीसाठी बरेच पर्याय समोर आले आहेत.
20 हजार पावलांवर 5 व्होल्ट वीजनिर्मिती
एक कॅपॅसिटर सुमारे पाच व्होल्टपर्यंत वीज रिस्टोअर करू शकते. बुटाच्या बाहेरील बाजूने मोबाइलच्या धर्तीवर प्लग असेल आणि तेथून वीज दुसरीकडे रूपांतरित केली जाईल. वीस हजार पावले चालल्यावर या बुटात पाच व्होल्ट वीज तयार होईल आणि खर्च फक्त दोनशे रुपये होईल, असा वैज्ञानिकांचा दावा आहे.