कदम यांना लोककला प्रबोधिनीतर्फे ‘लोकशिक्षक पुरस्कार’ प्रदान 

0

पुणे । रामसेतू बांधण्याच्यावेळी खारीने देखील मदत केली होती. तिचे काम सामान्य होते तरी देखील तिचा उल्लेख रामायणात केलेला आहे, हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. अनेक क्रीडापट्टूना घडविताना प्रभाकर कदम यांनी आपला मोठेपणा गाजविला नाही. देशी खेळांचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आहेत, असे अनेक शिक्षक समाजात असून अशा शिक्षकांचा गौरव  म्हणजे भारतीय संस्कृतीचा सन्मान आहे, असे मत सरस्वती मंदिर संस्थेचे अध्यक्ष प्रा. विनायक आंबेकर यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे आयोजित कार्यक्रमात शशिकांत ठाकूर स्मरणार्थ लोकशिक्षक पुरस्कार ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक प्रभाकर कदम यांना त्यांच्या निवासस्थानी प्रदान करण्यात आला. यावेळी शाहीर हेमंतराजे मावळे, पराग ठाकूर, वैभव वाघ, शिरीष मोहिते, आनंद सराफ, प्रा. संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, सुरेश तरलगट्टी आदी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, मानपत्र, श्रीफळ आणि उपरणे असे पुरस्काराचे स्वरुप होते.

ठाकूर म्हणाले, प्रभाकर कदम यांनी अनेक कबड्डीपट्टू तयार केले, परंतु आपल्या कार्याचा गाजावाजा न करता ते आपले कर्तव्य बजावित आहेत. शाहीर मावळे म्हणाले, विद्यार्थी दशेपासून ते तरुण वयापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करतो. सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी झटून काम करणार्‍या शिक्षकांचे प्रमाण कमी झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी झटणार्‍या शिक्षकांचा गौरव करण्याकरीता प्रबोधिनीतर्फे लोकशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येतो.