कधी बंद होणार टोल?

0

पुणे । पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील टोलच्या रकमेची वसुली झाल्याचा दावा करीत, टोल कधी बंद करणार असा सवाल शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते करत आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी वारंवार पत्रव्यवहार करूनही मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नसल्याची खंतही हे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

द्रुतगती मार्गावरील टोलनाक्यांवर होणार्‍या वसुलीची आकडेवारी राज्य रस्तेविकास महामंडळाने (एमएसआरडीसी) आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे आदेश राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर एमएसआरडीसी सातत्याने ही माहिती संकेतस्थावर देत आहे. याच आकडेवारीवरून माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या मार्गावरील टोलवसुली पूर्ण झाल्याचे दाखवून दिले आहे.

द्रुतगती मार्गावर 2019 पर्यंत टोलवसुलीचे कंत्राट देण्यात आले आहे. 2869 कोटी रुपये संबंधित कंपनीस मिळणे अपेक्षित आहे. ही रक्कम कंपनीस नोव्हेंबरमध्येच मिळाल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते व सजग नागरिक संघटनेचे विवेक वेलणकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे. एमएसआरडीसीने संकेतस्थळावर दिलेल्या माहितीतूनच ही बाब पुढे आली आहे. एमएसआरडीसीने दिलेली माहिती खरी असेल, तर कंत्राटदार कंपनीस नोव्हेंबर अखेरीसच 2869 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील टोल डिसेंबरमध्येच बंद होणे गरजेचे होते. तथापि, सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे, अशी खंत वेलणकर यांनी जनशक्तिशी बोलताना व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांशी आम्ही याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांनी एकदाही आमच्या पत्राचे उत्तर दिलेले नाही, असे सांगून वेलणकर म्हणाले, टोलची रक्कम वसूल झाल्यानंतरही कंत्राटदार कंपनीस टोल वसूल करू देणे हा गुन्हाचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवरच खटला भरण्याचा इशाराही आम्ही दोनदा दिला आहे. मात्र, त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही, ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

टोलवसुलीपोटी कंत्राटदारास दर महिना किमान 42 कोटी रुपये मिळतात, असे एमएसआरडीसीच्या आकडेवारीतूनच स्पष्ट होत आहे. डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या तीन महिन्यांचा विचार करता किमान सव्वाशे कोटींचे उत्पन्न कंत्राटदारास मिळाले आहे. हगे उत्पन्न बेकायदाच असून, वाहनचालकांची ही लूटच आहे. ती राज्य सरकार थांबवणार की नाही, हाच प्रश्‍न आहे. आता नागरिक आणि वाहनचालकांनीच याविरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे, असेही वेलणकर म्हणाले.