कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांचा लाक्षणिक संप

0

मुंबई । कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या मात्र त्यांची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, त्यामुळे या मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ या शिक्षकांच्या संघटनेच्या वतीने राज्यात 5 टप्प्यात आंदोलन करण्यात येत आहे. आता आंदोलनाचा चौथा टप्पा 2 फेब्रुवारी रोजी होणार असून या दिवशी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये (ज्युनिअर कॉलेज) बंद राहणार आहेत. या आंदोलनाच्या दरम्यान जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आणि मुंबईत आझाद मैदान येथे ’जेलभरो’ आंदोलन करण्यात येणार आहे.

’शासनाने तातडीने मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत आदेश न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. नाईलाजाने 12वी बोर्ड परीक्षेच्या काळात ‘बहिष्कार आंदोलन’ करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल,’ असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. यातील महत्त्वाची मागणी म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू करावा, अशी असून शिक्षकांच्या एकूण 32 मागण्या आहेत. या मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने शासनास दिले आहे.

या आहेत शिक्षकांच्या मागण्या
1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्यांनासुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करा, 2012 पासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता आणि वेतन द्या, सर्व शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी द्या, कायम विना अनुदानित शिक्षकांना अनुदान द्या, माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्या, 2003 ते 2010-11 पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता आणि वेतन द्या.