कन्नड घाटात टाईल्सचा ट्रक कोसळून चालकासह क्लिनर ठार

जळगाव : टाईल्सने भरलेला ट्रक औरंगाबादकडे जात असताना कन्नड घाटाच्या खोल दरीत कोसळल्याने चालकासह क्लिनर ठार झाले. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक चालक आसाराम आंबादास दाभाडे (29, रा.मुरूमखेडा, जि.औरंगाबाद व क्लिनर शेख गयास शेख दरबार (28, शेवगा, जि.औरंगाबाद) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

घाट संपत असतानाच दरीत कोसळला ट्रक
टाईल्सने भरलेला ट्रक (क्र.एम.एच.18 ए.ए. 7423) चाळीसगावहून औरंगाबादकडे कन्नडमार्गे जात असताना घाट संपण्यास अवघे 25 मीटर अंतर बाकी असताना ट्रक कन्नड घाटाच्या खोल दरीत कोसळला. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. या प्रकरणी शेख अनिल शेख गफ्फार (रा.मुरूमखेडा, जि.औरंगाबाद) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर सहाय्यक निरीक्षक सुनील पवार, अशोक चौधरी, प्रताप पाटील, योगेश बेलदार, विरेंद्रसिंग शिसोदे, सुनील पाटील, श्रीकांत गायकवाड, कादर शेख आदींनी धाव घेतली. तपास सहाय्यक निरीक्षक हर्षा जाधव करीत आहेत.