कन्नड घाट बोगद्याच्या कामाला तातडीने सुरूवात करा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जळगावात निवेदन

चाळीसगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र.52 वरील कन्नड घाटात नेहमीच लहान-मोठे अपघात घडत असतात. यावर आळा घालण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून प्रस्तावित बोगद्याच्या कामाला तातडीने सुरू करण्याची मागणी केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्र्यांना निवेदन
मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या दोघांना दळणवळणाच्या दृष्टीने जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.52 वरील कन्नड घाटाकडे बघितले जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे घाटात दरड कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे तब्बल पावणे दोन महिने घाट बंद करण्यात आल्याने अनेक वाहन धारकांना याचे मनस्ताप सहन करावे लागले होते. तत्पूर्वी या घाटात नेहमीच दर चार- पाच दिवसांनी वाहतूक कोंडी होऊन लहान-मोठे अपघात होत असतात. तसेच अनेक निष्पाप वाहन धारकांचा अपघात होऊन आपले जीव गमवावे लागले आहे. यामुळे चाळीसगाव तालुक्यातील बोढरे, तळोंदे प्रचा, पार्थदे गावातून जाणार्‍या प्रस्तावित बोगद्याच्या कामाला तातडीने सुरू करण्याची मागणी तमाम बंजारा समाजाच्या बांधवांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ते विविध विकासकामांचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जळगाव येथे आले होते.

तातडीने करावा कामाचा श्रीगणेशा
तत्पूर्वी कन्नड घाटात होणार्‍या अपघात आटोक्यात आणण्यासाठी व पर्यायी व्यवस्था म्हणून बोगद्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी युद्ध पातळीवर पाठपुरावा करून मंजूर करून घेतला परंतु सदर कामाला अद्यापपर्यंत मुहूर्त सापडला नाही आहे. त्यामुळे अनेकांनी गडकरींना साकडे घालून कामाबाबत कैफियत मांडली. दरम्यान सदर निवेदनात आज मितीस होणार्‍या प्रकल्पाला जेवढा विलंब होतील. तेवढेच अधिक प्रमाणात सरकारला पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सदर कामाला तातडीने हिरवी झेंडी दाखवून श्रीगणेशा करण्याबाबतचा निवेदन देण्यात आले.