कन्या जन्माच्या स्वागतासाठी चौधरी परिवाराने अंथरल्या फुलांच्या पायघड्या
मुलगी झाली हो; चाळीसगावात कन्या जन्माचे उत्स्फूर्त स्वागत
चाळीसगाव। ‘मुलगी झाली हो…’ म्हणत नकोशीचे स्वागत करण्यासाठी काहींची तोंड वाकडी होतात. स्त्री भ्रुणहत्येचा प्रश्नही डोके वर काढून असतो. असे निराशेचे मळभ असतांना अविनाश चौधरी यांच्या परिवारात मात्र ‘नकोशी’चे स्वागत ‘हवीशी’ म्हणून झाले. लक्ष्मी आली म्हणून कन्या रत्नाच्या आगमनासाठी बॅण्डच्या सुरांसोबत फुलांच्या पायघड्याही अंथरण्यात आल्या. या सोहळ्याचे परिसरात कौतुक होत आहे.
लेक जन्माचे उत्स्फूर्त स्वागत
‘ती’ निर्माल्य नाही तर ‘निर्माती’ व जननी आहे. याच भावनेतून काही परिवारांमध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत अलीकडे होऊ लागले आहे. फटाक्यांची आतषबाजी करत सनईच्या मंगल स्वरात लक्ष्मीच्या आगमनाचे सोहळे काहीअंशी होतात. मालेगाव रोडस्थित मे.जे.जे.चौधरी फर्मचे संचालक व भाजपाचे माजी शहराध्यक्ष अविनाश जगन्नाथ चौधरी यांच्या परिवारातही ‘लेकी’ जन्मासोबतच तिच्या दवाखान्यातून येण्यापासून ते घरी येईपर्यंतचा जल्लोष साजरा करण्यात आला.
सनईचे स्वर अन् फुलांच्या पायघड्या
अविनाश चौधरी, सुनंदा चौधरी यांचे सुपूत्र राहुल व कावेरी राहुल चौधरी यांना पहिले अपत्य कन्यारत्न झाले. ‘पहिली बेटी, स्नेह और आनंद की पेटी’ म्हणत चौधरी परिवाराने लेकी जन्माचा मोठा सोहळा करून समाजास सकारात्मक संदेह देण्याचा अभिनंदनीय प्रयत्न केला. सोमवारी मंद मंद विद्युत रोषणाईत आल्हाददायक गारव्यात सनई स्वर छेडले गेले. सोबतीला चौघड्याचा मंगल निनाद या सोबतच बॅण्डच्या सुरात संपूर्ण परिवाराने ठेका धरत मुलीच्या जन्माचा जल्लोष केला. परिसरात जिलेबी वाटून रहिवाश्यांचे तोंड गोड करण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या स्वागत सोहळ्याचे म्हणूनच सर्वत्र कौतुक होत आहे.
स्त्री-पुरूष समानता जपण्यासाठी स्वागत
महिलांनी कोणत्याही क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे. म्हणूनच स्त्री-पुरूष समानता जपण्यासाठी मुलीच्या जन्माचे स्वागतही जल्लोषात झालेच पाहिजे. या भावनेतून हा सोहळा साजरा केल्याचे चाळीसगावातील अविनाश चौधरी यांनी सांगितले.