तीन रीक्षांसह एका दुचाकीचे जमावाकडून नुकसान ; किरकोळ कारणातून वाद पोहोचला विकोपाला
भुसावळ– तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथे जळगाव तालुक्यातील खेडीच्या वर्हाडात झालेल्या वाद मिटवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेतल्याचे वाईट वाटून जमावाने तीन रीक्षांसहचे नुकसान करीत दुचाकी पेटवल्याची घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकारानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना सिंघम स्टाईल चोपल्याने अनेकांची पाचावर धार बसल्याने त्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी 14 आरोपींविरुद्ध दंगल व जीवे ठार मारण्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकारानंतर गावात तणावपूर्ण शांतता असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपींची धरपकड सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
‘सिंघमांचा रूद्रावतार’
गावात सर्रास सुरू असलेली दगडफेक तर दुसरीकडे वाहने जाळण्याचे प्रकार आरोपींकडून सुरू असतानाच सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी वाहनातून खाली उतरताच आरसीसी प्लाटूनसह उपस्थित अधिकार्यांना आरोपींच्या धरपकडचे आदेश दिले. संशयीतांना आणताच नीलोत्पल यांनी त्यांना चांगलाच कायद्याचा बडगा दाखवला तर अधिकार्यांचा रूद्रावतार पाहून उपस्थित जमाव लागलीच पांगल्याने शांतता निर्माण झाली. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले, सहाय्यक निरीक्षक आर.एन.होळकर, उपनिरीक्षक सचिन खामगड यांच्यासह तालुका पोलीस व आरसीपी प्लाटून घटनास्थळी धावली.
14 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा
शिवपूर-कन्हाळेत दंगल माजवल्याप्रकरणी जमील चंदू गवळी (26) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी हेमूसिंग राजेंद्र पाटील, कोमलसिंग उर्फ पांडु बाबू मेहेरे, गजानन रूपसिंग बोदर, घनश्याम भावसिंग बोदर, सुधीर तुळशिराम जोहरे, राजू मोहन बोदर, महेंद्र शहासिंग भोळे, राजेंद्र काशीनाथ मेहेरे, प्रवीण रूपसिंग बोदर, देविदास रूपसिंग बोदर, राजेश गणेश सावकारे, बबलू राजू पाटील, खेडी माजी सरपंचाचा दुसरा मुलगा (नाव, गाव माहित नाही), राजेंद्र भावराव पाटील, खेडी गावातील इतर दहा ते 15 अनोळखी लोकांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 20 रोजी रात्री साडेनऊ वाजता शिवपूर कन्हाळा गावात रीक्षा स्टॉपवर खेडी येथील लग्नाचे वर्हाड आल्यानंतर त्यातील चार ते पाच लोकांनी रीक्षा स्टॉपवर येऊन रीक्षांची मोडतोड केली तसेच दुचाकी जाळल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी प्रवीण बोदर, गजानन बोदर, देविदास बोदर, राजेश सावकारे यांना 25 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर, हवालदार युनूस शेख, नाईक नितीन सपकाळे करीत आहेत.