जळगाव – रियल ईस्टेट प्रॉपर्टीच्या व्यावसायिकाकडे ०६ सप्टेंबर रोजी कपाटातील ८५ हजाराची रोकड लंपास झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासचक्रे फिरवून तसेच सीसीटीव्ही फुटेज अभ्यासून या निवासस्थानात कामाला असलेली मोलकरीण तसेच येथे अभ्यासानिमित्त येत असलेली युवती यांनी ही चोरी केल्याचे तपासातून समोर आल्याने मंगळवारी सकाळी पोलिसांनी महिलेसह युवतीला ताब्यात घेतले.
अल्पवयीन मुलीचा समावेश
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रवीणचंद्र जिनाभाई पटेल (७४) हे प्लॉट नं. ४०, ४१ पटेलनगर येथे वास्तव्यास आहेत. ते जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. या ठिकाणी त्यांच्या पत्नी सविता असे दोघे जण राहतात. मनीषा माळी (हरिविठ्ठलनगर) ही महिला धुणी भांडी व घरातील इतर कामासाठी मोलकरीण म्हणून कामाला आहे. तर पटेल यांच्याकडे पूर्वी कारवर चालक असलेले संजय माळी यांची मुलगी सोनाली (नाव बदललेले ) ही अभ्यास करण्यासाठी या बंगल्यावर येत होती. ०६ सप्टेंबर १८ रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास पटेल यांच्या घरात असलेल्या टी.व्ही. रूममधील स्टिलच्या कपाटात लॉकरमध्ये ८५ हजार रूपये ठेवलेले होते. नंतर पटेल यांच्याकडे सत्संगाचा कार्यक्रम ०८ सप्टेंबर रोजी असल्यामुळे रात्री ०९ वाजता कपाटामध्ये ठेवलेले पैसे हे त्यांच्या पत्नी सविता काढण्यासाठी गेल्या असता त्यांना लॉकरमध्ये रोकड मिळून आली नाही. नंतर त्यांनी हा प्रकार पती प्रवीणचंद्र पटेल यांच्या कानावर टाकला.
पटेल यांनी सीसीटीव्हीचे पाहिले फुटेज
पटेल यांनी घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले असता टी.व्ही. रूममधील कॅमेरा बंद करताना सोनाली दिसली. तर त्यावेळी मनीषा हीदेखील तेथे हजर दिसत आहे. सदर कपाटामध्ये ठेवलेले पैसे हे मनीषा व सोनाली या दोघींनी घेऊन गेल्याचा संशय बळावल्याने याप्रकरणी त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, घटनास्थळी पीएसआय रोहिदास ठोंबरे,पोहेकॉ़ विजय निकुंभ, ,पोहेकॉ़राजेश पाटील यांनी सोमवारी पटेलनगरमध्ये धाव घेत कुटुंबियांकडून माहिती जाणून घेतली. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित महिला कपाटाच्या रूममध्ये दिसून आल्या. त्यानंतर आज दुपारी हरिविठ्ठलनगरमध्ये जाऊन महिलेसह युवतीस ताब्यात घेत रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये आणले. नंतर पोलीस निरीक्षक बी.जे.रोहोम यांनी दोघांची चौकशी केली. काही मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला.