कपिलला मिळाली भाईजानची साथ

0

मुंबई : बॉलीवूडचा भाईजान सलमान खान बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचा आजवर गॉडफादर ठरला आहे. कॅटरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, आयुष शर्मा, डेझी शाह, जॅकलिन फर्नांडिस यांसारख्या अनेक कलाकारांना त्याने बॉलिवूडमध्ये प्रवेश करायला मदत केली आहे. आता आणखी एका कलाकाराला सलमान खान मदत करणार आहे.

कॉमेडीचा किंग कपिल शर्मा गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांपासून दूर आहे. कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ अचानक बंद पडला. त्यानंतर त्याचा फिरंगी हा चित्रपट आपटला. त्यामुळे आता कपिल शर्मा पुनरागमन करूच शकत नाही. पण आता त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येणार असून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.

या कार्यक्रमाची निर्मिती आजवर दोन वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसने केली होती. K9 आणि फ्रेम्स प्रोडक्शन मिळून या कार्यक्रमाची निर्मिती करत होते. पण गेल्या सिझनमध्ये कपिल आणि फ्रेम्स प्रोडक्शनचे चांगलेच वाजले होते. कपिलच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे द कपिल शर्माच्या गेल्या सिझनची निर्मिती एकट्या कपिलने केली होती. पण या सिझनसाठी कपिल निर्मात्याच्या शोधात असून सलमान खानने त्याला मदतीचा हात दिला असल्याची चर्चा आहे. सलमान खानच्या ‘सलमान खान प्रॉडक्शन’ हाऊसतर्फे या कार्यक्रमाची निर्मिती केली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.