कपिल देवच्या मते इंग्लंडचा संघ चॅम्पियन्सचा ‘किंग’!

0

नवी दिल्ली । भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या मते इंग्लडचा संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचा किंग होईल. इंग्लंडचा संघ आगामी स्पर्धेत अधिक चांगली करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कपिल म्हणाले की, भारतीय संघ जिंकावा असे मनापासून वाटते, पण क्रिकेटरच्या नजरेतून पाहिल्यास ते कठीण असल्याचे दिसते. कागदावर दिसणारा भारतीय संघ प्रभावी आहे. भारताला संधी आहे, पण वन-डे क्रिकेटमध्ये बड्या नावांपेक्षा संघातील योगदानाला अधिक महत्त्व असते, इंग्लंडच्या संघात सध्या ती धमक असल्याचे ते म्हणाले.

वनडेसाठी आवश्यक क्षमता ब्रिटीश संघात
भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करतो आहे. 2011 चा विश्वचषक आणि 2013 मधील चॅम्पियन्स कंरडक स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली होती. यावेळी संघात विजय मिळवून देण्याची क्षमता असणारे खेळाडू होते, असेही कपिल यावेळी म्हणाले. कपिल म्हणाले की, 40 वर्षानंतर पहिल्यांदाच मला इंग्लंडच्या संघाने प्रभावित केले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आवश्यक असणारी क्षमता सध्या इंग्लिश खेळाडूंमध्ये दिसते. जॅसन रॉय, जॉस बटलर, जो रुट, इयोन मॉर्गन आणि बेन स्टोक्स हे खेळाडू स्वत:च्या जोरावर सामना जिंकून देऊ शकतात. त्यामुळे इंग्लडचा संघ घरच्या मैदानावर चॅम्पियन ठरू शकतो. यावेळी भारतीय क्रिकेटमधील प्रतिभावंत खेळाडूंमध्ये सध्या संघात असणारा महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग यांच्यासह माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि सौरभ यांच्यामध्ये एकहाती सामना जिंकून देण्याची धमक होती, असेही त्यांनी सांगितले. 1 जुन पासून इंग्लड आणि वेल्समध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ ‘ब’ गटात असून या गटात भारतासमोर पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांचे आव्हान असणार आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या स्पर्धेत उतरणार आहे.