मुंबई । जय शिव (ठाणे) आणि वाघजाई (रत्नागिरी) यांनी आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत स्वामी समर्थ क्रीडा मंडळ प्रभादेवी या संस्थेने अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या राज्य स्तरीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. जय शिव आणि स्वस्तिक यांच्यातील लढत चांगलीच रंगतदार झाली. मध्यंतराला 11-12 अशा नाममात्र पीछाडीवर पडलेल्या जय शिवने ती 29-22 अशी जिंकताना मग उत्तरार्धामध्ये जो लोन चढविला तो जसा निर्णायक ठरला तशा त्यांनी केलेल्या तीन सुपर पकडी. त्यामानाने वाघजाईचा विजय अगदीच एकतर्फी झाला. साखळीमध्ये पुण्याच्या उत्कर्षचा काहीसा संशयास्पद पराभव करणार्या गोल्फादेवीचा रत्नागिरीकरांनी 54-17 असा धुव्वा उडविला. आंतरराष्ट्रीय शुभम शिंदेच्या नेतृत्वाखाली खेळणार्या वाघजाई कडे संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे. उपांत्यपूर्व फेरीतील अन्य लढतींमध्ये पिंपळेश्वरने सांगलीच्या न्यू उत्कर्षचा 29-27 असा निसटता पराभव केला. उत्कर्ष (पुणे) या संघाने मग उपनगरच्या संघर्षचा 41-25 असा सहज पराभव केला. पिंपळेश्वर आणि न्यू उत्कर्ष यालढतीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.
मात्र दोन्ही संघांनी नियोजनामध्ये ज्याप्रकारे ढिलाई दाखवली त्यामुळे खेळात डावपेच कमी पडल्यास काय होते हे स्पष्ट झाले. सांगलीकर 26-27 असे मागे होते व ते खेळाचे शेवटचे मिनिट होते पण तो महत्वाचा एक गुण मिळविण्यासाठी त्यांनी केलेल्या अयशस्वी प्रयत्नात त्यांनी दोन गुण गमावले. पिंपळेश्वरकडून ऋशिकेश कनेरकर, सिद्धेश येसणे यांच्या चढाया निर्णायक ठरल्या व सोहम बेलोसेचा बचाव तेवढाच महत्वाचा ठरला. खरेतर पिंपळेश्वरने मध्यंतराला 15-5 अशी चांगली आघाडी घेतल्यावर उत्तरार्धात लोनची आफत ओढवून घेतली हे जरा आश्चर्यकारक वाटले. संग्लीकडून यासीन आंबी आणि मारुती घोडके यांनी भेदक आक्रमणे केली.
अमान जमादारने उत्तम पकडी करून खेळाला मोठी कलाटणी दिली पण ती व्यर्थ ठरली. जय शिव विरुद्ध उपनगरच्या स्वस्तीकला खेळ ऐन रंगात आला असता जी एका तांत्रिक गुणाची किंमत मोजावी लागली ती कादाचीत विजय आणि पराभव यामधले अंतर ठरली. प्रतिस्पर्ध्यांकडे 22-20 अशी आघाडी होती व स्वस्तिकच्या दोन उत्साही खेळाडूंनी आक्रमणासाठी एकाच वेळी मध्यरेषा ओलांडली आणि घात झाला. तोपर्यंत आंतरराष्ट्रीय निलेश शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा संघ बाजी उलटवेल असे वाटले होते. थानेकारांकडून अनिकेत चिकणे, शुभम सिंघ यांनी चढाईत सातत्य दाखवले, प्रतिक तरेने बचावात चमक दाखविली. वाघजाईच्या सुनियोजित खेळामुळे प्रतिस्पर्धी हतबल होत आहेत. अजिंक्य पवार, ओंकार कुंभार यांच्या चढाया, शुभमचा सर्वांगीण खेळ, आशिष सल्विच्या पकडी त्यांना लाभदायी ठरत आहेत. ओंकारने या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम चढाई केली. त्याने चार गाडी बाद करत लोणच्या दोन गुणांसह सहाची सुपर चढाई केली. वाघजाईने उत्तरार्धात एकूण चार लोन चढवले.