जकार्ता: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करत आहे. मात्र कबड्डी स्पर्धेत भारताला अपेक्षित यश येत नसल्याचे दिसून येते कारण आता पुरुषांपाठोपाठ भारतीय महिला कबड्डी संघालाही एशियाडमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. सुवर्णपदकासाठी झालेल्या सामन्यात इराणच्या महिलांनी भारतीय महिलांचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. इराणने २७-२४ च्या फरकाने हा सामना जिंकला.
इराणविरुद्ध अंतिम सामना खेळताना भारतीय महिला संघावर चांगलचं दडपण होतं. पहिल्या काही मिनीटांमध्ये दोन्ही संघातल्या खेळाडूंनी सावध पवित्रा आजमवलेला पहायला मिळाला. भारतीय संघातल्या चढाईपटूंनी बोनसवर गुण मिळवणं पसंत केलं. यानंतर भारतीय बचावपटूंनी आपल्या खरा रंग दाखवत इराणच्या खेळाडूंच्या उत्कृष्ट पकडी केल्या. या बळावर भारताने ६-२ अशी मोठी आघाडी घेतली. मात्र पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनीटांमध्ये इराणच्या बचावपटूंनी जोरदार पुनरागमन करत पिछाडी कमी केली.
दुसऱ्या सत्रात इराणच्या महिलांनी आपला खेळ आक्रमक केला. भारताच्या सोनाली शिंगटे, साक्षी कुमारी, कविता, पायल चौधरी यासारख्या चढाईपटूंना बाद करत सामन्यात आघाडी घेतली.