पुणे, नागपूर, मुंबईत एकाचवेळी छापेसत्र : एल्गार परिषदेचे नक्षल कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न
मुंबईत सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार, पुण्यात रमेश गायचोर, सागर गोरखे यांच्या घरांवरही छापे
नागपुरात नक्षलवाद्यांच्या केसेस लढणारे अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्याही घराची झाडाझडती
पुणे : पुणे येथे 31 डिसेंबर 2017 रोजी झालेली एल्गार परिषद, 1 जानेवारीरोजी उसळलेला हिंसाचार आणि 3 जानेवारीरोजी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद या प्रकरणी कबीर कलामंच आणि रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयांवर आणि कार्यकर्त्यांच्या घरांवर पुणे पोलिसांसह मुंबई व नागपूर पोलिसांनी छापे घातले. मुंबई, पुणे आणि नागपूर येथे पहाटेच्या सुमारास प्रत्येकी दहा ते बारा पोलिसांच्या पथकांनी एकाचवेळी हे छापे टाकले. त्यासाठी त्यांनी न्यायालयातून सर्च वॉरंट प्राप्त केले होते. मुंबईत सुधीर ढवळे व हर्षाली पोतदार, पुण्यात रमेश गायचोर व वाकड येथे सागर गोरखे तर नागपुरात अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी छापे टाकण्यात आले. अॅड. गडलिंग हे नक्षली केसेस लढवित असतात. यासह कबीर कलामंच व पँथरच्या पुणे व मुंबईतील कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले. या छाप्यांत संगणक, लॅपटॉप, पेनड्राईव्ह आदी साहित्यांसह अन्य काही साहित्यदेखील जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पुणे पोलिसांनी नागपुरात जाऊन कारवाई केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. पुण्यातील विश्रामबाग आणि सहकारनगर पोलिस ठाण्यांत कबीर कलामंचच्या कार्यकर्त्यांवर कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सहकारनगर पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेचे पोलिसदेखील या छापेसत्रांत सहभागी झाले होते.
सीडी, पेनड्राईव्ह, पुस्तके, पत्रके जप्त
एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव परिसरात झालेल्या दगडफेक व हिंसाचारात तसेच त्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंददरम्यानच्या हिंसाचारात कबीर कलामंच व रिपब्लिकन पँथर या दोन संघटनांचादेखील हात असल्याचा पुणे पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या संघटनांची व त्यांच्याशी संबंधित संशयितांची कायदेशीर चौकशी करण्यासाठी म्हणून पोलिसांनी न्यायालयाकडून सर्च वॉरंट प्राप्त करून मंगळवारी भल्यापहाटे पुणे, वाकड, मुंबई, नागपूर येथे छापेसत्र राबविले. पुण्यातील कबीर कलामंचच्या सर्व कार्यकर्त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले असून, या कार्यकर्त्यांनी केलेल्या गाण्यांच्या सीडी, पेनड्राईव्ह, कोरेगाव भीमा या इतिहासाबद्दलची पुस्तके, आणि एल्गार परिषदेने कबीर कलामंचच्यावतीने वाटण्यात आलेली पत्रके ताब्यात घेण्यात आली आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यात दलित चळवळीकडून पुण्यात एल्गार परिषद भरविण्यात आली होती. त्यासाठी जेएनयूतील नेता उमर खालिद, जिग्नेश मेवाणी हे दोघे पुण्यात आले होते. या दोघांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात प्रक्षोभक भाष्य केले होते. त्यानंतर दुसर्याच दिवशी भीमा कोरेगाव येथे शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या दलितांवर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. तसेच, एकबोटेंना अटकदेखील करण्यात आली आहे. त्यानंतर तीन जानेवारीरोजी दलित संघटनांकडून बंद पाळण्यात आला होता. या बंददरम्यान अनेक ठिकाणी तोडफोड व जाळपोळ झाली होती.
छापेसत्राचा एल्गार परिषदेशी संबंध नाही : मुख्यमंत्री
ज्यांना अटक केली पाहिजे, त्या संभाजी भिडे गुरुजींना हे सरकार अटक करत नाही. तेच भीमा कोरेगाव दंगलीचे खरे सूत्रधार आहेत. मात्र आम्हाला त्रास देण्यासाठी या धाडी मारण्यात येत आहेत, असा आरोप कबीर कलामंच आणि रिपब्लिकन पँथरच्यावतीने करण्यात आलेला आहे. दरम्यान, दिवसभराच्या छापेसत्राबाबत पोलिस अधिकार्यांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला होता. कारवाई पूर्ण झाल्यानंतर माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आजच्या धाडींचा एल्गार परिषदेशी संबंध नाही. शहरी भागात नक्षली चळवळींची पाळेमुळे रुजत आहे, त्याच्या संशयावरून संबंधित कारवाई करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.