कबुतरखाना बंद करणची मनसेची पालिका आयुक्तांकडे मागणी

0

मुंबई । कबुतरांमुळे श्‍वसनांचे विकार होत असल्याने स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असा मुद्दा मनसेने पुन्हा हाती घेऊन दादरचा कबुतरखाना त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. मनसेने याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना दिले आहे. ग्रेड-2 दर्जाची वास्तू असलेला दादरचा कबुतरखाना कायमचा बंद करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. कबुतरांमुळे दादरमधील अनेक रहिवासी, विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना श्‍वसनाचे विकार जडले आहेत. याशिवाय, पक्ष्यांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक इमारतींच्या खिडक्या खराब झाल्याचे मनसेने म्हटले आहे. कबुतरांच्या पिसांमुळे श्‍वसनास त्रास आणि अस्थमा झाल्याच्या परिसरातील अनेक रहिवाशांच्या तक्रारी आल्याचे मनसेचे म्हणणे आहे.

महापालिका यावर उपाय शोधण्यात अपयशी ठरल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. त्यामुळे आम्ही हा अनधिकृत कबुतरखाना बंद करण्याची मागणी आयुक्तांकडे केल्याचे त्यांनी सांगितले. मनसेच्या मागणीवर पालिकेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भाजपने मात्र कबुतरखानाच्या बंदीला स्पष्ट शब्दांत विरोध केला आहे. कबुतरखाना ही ऐतिहासिक वास्तू असून कबुतरांना खाद्य देण्यामागे समाजाची धार्मिक भावना जोडली गेली आहे. त्यामुळे मनसेच्या मागणीशी आम्ही अजिबात सहमत नाही, असे भाजपचे नेते राज पुरोहित यांनी सांगितले. लंडनमधील काही शहरांमध्येही कबुतरांना खाद्य देण्याची प्रथा आहे, याचाही दाखला यावेळी पुरोहित यांनी दिला.

अद्याप निर्णय नाही
दादरमध्ये 1933 साली सुशोभिकरणासाठी पाण्याचा कारंजा बांधण्यात आला होता. मात्र त्यानंतर अनेक रहिवाशांनी तिथे कबुतरांना दाणे देण्यास सुरुवात केली. कालांतराने हा कारंजा कबुतरखाना म्हणून प्रचलित झाला. यापूर्वीही मनसेने कबुतरखाना बंद करण्याची मागणी पालिकेकडून केली होती. पण त्यावर कोणताही मनपाने निर्णय घेतला नाही. महापालिका निवडणुकीच्या काळात शिवसेनेने दादरच्या राऊळ मैदानात सभेसाठी परवानगी नाकारल्यानंतर राज ठाकरे यांनी याच कबुतरखान्याजवळ जाहीर सभा घेतली होती.