मुंबई । मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या कमला नेहरू पार्क उद्यानातून मुंबई दर्शन घडावे, यासाठी ’व्ह्युइंग गॅलरी’ आड येणार्या टोलेजंग इमारतींच्या उंचीबाबत मर्यादा घालण्यात आल्या आहेत. मलबार हिलसह मरीन ड्राइव्ह परिसरात नव्याने उभ्या राहणार्या उत्तुंग इमारतींचा यात समावेश आहे. त्यामुळे या इमारतींचे जीआयएस प्रणालीद्वारे त्रिमितीय प्रतिकृती तयार केली असून, याकरिता पालिकेने सुमारे 1 कोटी 62 लाख रुपये खर्च केले आहेत. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर कार्योत्तर मंजुरीसाठी ठेवला आहे. या परिसरात उंच इमारती बांधल्या जात असल्याने कमला नेहरु पार्कचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. मुंबईतील पर्यटनासाठी महत्त्वाचे असलेले ठिकाण कायम राहावे याकरिता पालिका सतर्क झाली आहे.
मलबार हिलमधील कमला नेहरु उद्यानातील ‘व्ह्युईंग गॅलरी’मधून बॅकबे, मरीन ड्राईव्ह परिसराच्या पूर्व आणि दक्षिणेकडील दृष्टिक्षेपात येणार्या इमारतींची ’जीआयएस’च्या मदतीने त्रिकोणात्मक प्रतिकृती बनवण्याची निर्देश नगरविकास खात्याने दिले होते. त्यानुसार ‘डी’ विभागाच्या विकास नियंत्रण आराखड्यावर दृष्टिक्षेपाचे कोन चिन्हाकिंत करण्यात आले. यामध्ये कोणतीही इमारत 21.35 मीटरपेक्षा अधिक उंचीची बांधता येणार नाही. या भागातील एकूण 108 भूखंड व परिसराची पाहणी करून यासाठी रेषेच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत तसेच त्यांचे जीआयएस प्रणालीत विश्लेषण करून डिजिटल एलिव्हेशन मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे डिजिटल मॉडेल बनवण्यासाठी आयआयटी पवई या संस्थेची नेमणूक केली. निविदा न मागवता हे काम आयआयटीला देण्यात आल्याने याला विरोध होण्याची शक्यता आहे.