कमला नेहरू रुग्णालयाचा खोटारडेपणा उघड

0

पुणे । प्रत्यक्षात तीन भूलतज्ज्ञांची नेमणूक असताना आता भूलतज्ज्ञ नाही, तुम्ही ससून रुग्णालयात जा, असे रुग्णांना महापौरांसमोर सांगण्याचा प्रकार कमला नेहरू रुग्णालयात घडला. महापौर मुक्ता टिळक यांनी अचानक पाहणी करून रुग्णालयात स्टिंग ऑपरेशनच केले. या वेळी डॉक्टरांची गैरवर्तणूक उघडकीस आली. प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला भूलतज्ज्ञ नसल्याने दुसर्‍या रुग्णालयात जाण्याचा सल्ला महापौरांसमोर देण्यात आला. महापौरांनी संबंधित डॉक्टरांना फैलावर घेत व्यवस्था सुधारण्याची तंबी दिली.

एकही डॉक्टर उपस्थित नव्हता
संतापलेल्या महापौर टिळक यांनी या वेळी उपस्थित डॉक्टरांना फैलावर घेतले. प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे यांना दूरध्वनी करून त्यांना भूलतज्ज्ञ डॉक्टरांची त्वरित व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापौरांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. तिथे त्यांना अनेक त्रुटी आढळल्या. रात्रीच्या वेळी तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टर उपस्थित असण्याची गरज असताना तिथे एकही डॉक्टर नव्हता. उपस्थित डॉक्टर रुग्णांची पाहणी वगैरे करत नव्हते. एका खासगी संस्थेच्या वीतने सुरू करण्यात आलेला कार्डियोलॉजी विभाग व्यवस्थित आहे, मात्र महापालिकेचे विभाग व्यवस्थित नाहीत, असे त्यांना आढळले. अंदाजपत्रकात वैद्यकीय विभागासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तरीही या ठिकाणी दुरवस्था का असते, याचा शोध प्रशासनाने घ्यावा, गरीब नागरिकांसाठी आरोग्यसेवा अशी असेल, तर त्यांनी जायचे कुठे, असा सवाल महापौरांनी केली. आयुक्तांकडे याबाबत सविस्तर तक्रार करणार असल्याचे व त्याचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्ही ससून रुग्णालयात जा
विशेष म्हणजे या रुग्णालयात तीन भूलतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी एकही डॉक्टर रात्री रुग्णालयात येत नाही. काहीही कारणे त्यासाठी दिली जातात. महापालिकेच्या सेवेत असूनही प्रत्यक्ष सेवा देणे टाळले जाते. महापौरांकडे याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी कोणालाही कसलीही कल्पना न देता अचानक कमला नेहरू रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी या महिलेच्या नातेवाईकांना उपस्थित डॉक्टरांनी आमच्याकडे आता भूलतज्ज्ञ नाही, तुम्ही ससून रुग्णालयात जा, असा सल्ला दिला. महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच हा प्रकार घडला. त्या महिलेच्या नातेवाईकांनी आम्हाला ससूनला जायचे नाही, येथेच काहीतरी करा, अशी विनंती केली.