पुणे । पुणे महापालिका आणि टीएचएस वेलनेस संस्थेच्या वतीने कमला नेहरू रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब उभारण्यात येणार असून त्यासोबत अद्ययावत सुविधा असलेले कार्डियाक सेंटर लवकरच सुरू केले जाणार आहे. या सेंटरमध्ये नागरिकांना शासकीय दरापेक्षा 5 टक्के कमी दराने उपचार सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे हृदयविकारांसारख्या रोगांवरील उपचार अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होणार आहेत.
708 चौरस मीटरमध्ये कार्डियाक सेंटर
कमला नेहरू रुग्णालयात नव्याने उभ्या राहत असलेल्या या कॅथलॅबमुळे स्वतःचे कार्डियाक सेंटर असलेली महापालिका असा लौकिक मुंबई महापालिकेनंतर पुणे महापालिकेला मिळणार आहे. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर तब्बल 708 चौरस मीटरमध्ये उभ्या राहत असलेल्या या कार्डियाक सेंटरमध्ये महिलांसाठी वॉर्ड, जनरल वॉर्ड, कॅज्युलिटी, सेमी प्रायव्हेट आणि एक स्पेशल रूम उभारण्यात येत आहे. याव्यतिरिक्त रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी मुख्य ऑक्सिजन प्रकल्पही उभारण्यात आला असून सर्व वॉर्डात ऑक्सिजन वाहिन्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याखेरीज स्ट्रेस टेस्ट आणि 2 डी इको मशीनच्या सुविधाही रुग्णांना घेता येणार आहेत.
योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत कक्ष
हृदयविकारासारख्या रोगांवर उपचार घेणे अनेकांना परवडत नाही. खासगी रुग्णालयात महागडे उपचार घेताना अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. त्यामुळे ही अत्याधुनिक कॅथलॅब उभारण्याचा निर्णय गेल्या वर्षी महापालिकेने घेतला होता. त्यासाठी तत्कालीन स्थायी समितीने निधीचेही वर्गीकरण करून दिले होते. त्या माध्यमातून तब्बल साडेसात कोटी खर्चून कॅथलॅब मशीन आणि कार्डियाक सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये शासकीय दरापेक्षा कमी खर्चात उपचार केले जाणार असून शहरी गरीब आरोग्य योजना, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनांचा लाभ रुग्णांना मिळवून देण्यासाठी मदत कक्षही उभारण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक अजय तायडे यांनी दिली.
हृदयविकारावर उपचार
नव्याने उभ्या राहत असलेल्या कार्डियाक सेंटरमध्ये अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, लहान मुलांच्या हृदयाला असलेल्या छिद्रावर करण्यात येणार्या शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, न्युरो प्रॉब्लेम्स, व्हेरिकोज व्हेन्स अशा आजारांवर उपचार केले जाणार आहेत. याशिवाय तीन ओपीडी, कॅज्युलिटी, अद्ययावत अतिदक्षता विभाग अशा सुविधांनी सज्ज असलेल्या या कक्षात नामांकीत हृदयविकार तज्ज्ञांमार्फत रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत, असेही तायडे यांनी सांगितले.