कमला मिल दुर्घटनेचा अहवाल सीएमकडे

0

आगप्रकरणी १० अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे निर्देश; दुर्घटनेचा चौकशी अहवाल पालिका आयुक्तांनी केला सादर

मुंबई । कमला मिल परिसरात मोजोस आणि वन अबव्ह या दोन पबला आग लागून १४ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पालिका आयुक्तांनी सादर केला. या अहवालात हॉटेल मालकांविरोधात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येणार आहे. तसेच दोन सहाय्यक आयुक्त, एक उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, तसेच अग्निशमन दलातील १० अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. विकास नियंत्रण नियमावली व माहिती तंत्रज्ञान धोरण यांचा गैरवापर केला गेला असल्याने त्याबाबत कारवाई करण्यासाठी पालिका आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांकडे ३ महिन्याची मुदत मागितली आहे. उपहारगृह, हॉटेल्स इत्यादींच्या परवाना प्रक्रियेची पुर्नमांडणी गरजेची असून, मुंबई पालिकेच्या स्तरावर ही प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी त्यात स्तर असणे आणि एका स्तराची प्रक्रिया व मान्यता मिळाल्यानंतरच दुसऱ्या स्तरावरील प्रक्रियेची कार्यवाही सुरु होईल, अशी सुधारित प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. विकास नियंत्रण नियमावलीतील संबंधित बाबींची प्रतिपूर्ती झाल्यानंतरच अनुज्ञापनाविषयीची प्रक्रिया सुरु होईल. यानुसार आवश्यक ती कार्यवाही पुढील दोन महिन्यात करण्यात येणार आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

बहुतांश प्रकरणांमध्ये मान्यता देताना ती कायद्यानुसार दिली जाते आणि काही अटीसापेक्ष दिली जाते. मात्र संबंधित कायद्याच्या व अटींच्या अनुषंगाने पूर्तता होत असल्याची खातरजमा नियमितपणे करण्यासाठी प्रभावी यंत्रणा नाही. हे लक्षात घेता मुंबई अग्निशमन दलाच्या अंतर्गत स्वतंत्र अशी पूर्तता तपासणी करणारी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. या अनुषंगाने संबंधित यंत्रणेसाठी सुनिश्चित कार्यपद्धती, मनुष्यबळ आणि तपासणीची तत्वे निश्चित करणे गरजेचे आहे आणि उपहारगृहांशी, आस्थापनांशी संबंधित संघटनांनी आपल्या संघटनांच्या सदस्यांच्या स्वतंत्रपणे तपासणी करावी. या तपासणी दरम्यान ज्या ठिकाणी नियमांची पूर्तता होत नाही असे आढळून येईल, त्यांचे संघटना सदस्यत्व रद्द करावे, अशी शिफारसदेखील अहवालात केली आहे. कमला मिलच्या संबंधित मालक यांनी अग्नीसुरक्षा प्रतिबंधक बाबींची अंमलबजावणी केली नव्हती. तसेच या इमारतीमध्ये अत्यंत अव्यवसायिकपणे केलेले बांधकाम व ज्वालाग्राही पदार्थांचा वापर करुन केलेली अंतर्गत सजावट यामुळे या घटनेची व्यापकता वाढली. हे लक्षात घेता, संबंधित मिलचे मालक, दोन्ही रेस्टॉरंटचे मालक व संबंधित वास्तू विशारद व अंतर्गत सजावटकार यांना या घटनेला जबाबदार धरुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे प्रस्तावित आहे. व्यावसायिक इमारती आणि मोठ्या आस्थापना यांनी मनुष्यबळ नेमताना अग्निसुरक्षा अधिकारी यांची नेमणूक करावी. तसेच सदर अधिकाऱ्यांच्या नाव व संपर्क इत्यादी माहिती प्रमुख अग्निशमन अधिका-यांकडे सादर करावी. परवाना प्रक्रिया गतिशिल होणे गरजेचे आहे. परवानगी प्रक्रियेचे सुलभीकरण ही व्यवसाय क्षेत्राची गरज आहे. या अनुषंगाने मान्यता देणाऱ्या संस्थांनी संबंधित प्रक्रिया गतिशिल होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र याचा गैरफायदा घेतला जाऊ नये, यासाठी ज्या आधारावर मान्यता दिलेली आहे त्या बाबींची पूर्तता सुयोग्यप्रकारे होत असल्याची खातरजमा नियमितपणे करण्यासाठी सक्षम यंत्रणादेखील उभारावी, अशा सुचना करण्यात येणार आहेत.

नियमांचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षा
खाद्यगृहे व उपहारगृहे यांच्या संबंधातील परवानग्यांची पद्धत अधिक कठोर करण्याची पद्धत अधिक गतिशिल करण्याची गरज आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांवर अधिक कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका अधिनियमातील संबंधित कलमांमध्ये आवश्यक त्या सुधारणांची शिफारस करण्यात येत आहे. उपहारगृहांची व मॉन्सून शेडची अनुज्ञापन प्रक्रिया अधिक सुधारित करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. अग्निसुरक्षा नियमांची परिणामकारक व परिपूर्ण अंमलबजावणी; तसेच अग्निसुरक्षेच्या दृष्टीने इमारतीतील ज्या जागा मोकळ्या राहणे गरजेचे आहे, त्या मोकळ्याच असायला हव्यात. यादृष्टीने नियमांच्या पूर्ततेची तपासणी नियमितपणे करण्याकरिता सक्षम यंत्रणा गरजेची आहे. नियमांची पूर्तता झाल्याचे तपासणी करणारी महापालिकेतील यंत्रणा व इतर संस्थामधील यंत्रणा अधिक बळकट होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे कायद्याचे पालन करणाऱ्या व्यवसायिकांना प्रोत्साहन मिळू शकेल. तर उल्लंघन करणाऱ्यांना प्रतिबंध होईल, असे अहवालात म्हटले आहे.

लोअर परळमधील नवरंग स्टुडीओत आग 

मुंबईत आग लागण्याचे सत्र सुरुच असून लोअर परळमधील नवरंग स्टुडिओत शुक्रवारी पहाटे आग लागली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून या घटनेत अग्निशमन दलातील १ कर्मचारी जखमी झाला आहे. लोअर परळमध्ये नवरंग स्टुडिओ असून हा स्टु़डिओ गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. शुक्रवारी पहाटे स्टुडिओत भीषण आग लागली. आग लागली त्यावेळी स्टुडिओत कोणीही नव्हते. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आग विझवताना अग्निशमन दलातील एक जवान जखमी झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मुंबईतील अग्नितांडवाचे सत्र सुरुच आहे. यापूर्वी कांजुरमार्गावरील सिनेव्हिस्टा स्टुडिओत लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला होता. ४ जानेवारी रोजी अंधेरीत वातानुकूलन यंत्रामध्ये लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. मैमून मंजिल येथे ही घटना घडली होती. त्यापूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह व मोजो ब्रिस्टो या पबमध्ये आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८ डिसेंबर रोजी साकीनाका भानू फरसाण मार्टमध्ये लागलेल्या आगीत १४ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.