कमला मिल प्रकरण सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न

0

सीबीआय चौकशी न झाल्यास जनहित याचिका दाखल करणार

मुंबई : कमला मिल आग प्रकरण गंभीर असून मुंंबई महापालिका आणि राज्य सरकार हे प्रकरण दडपू पाहत आहे. सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी न केल्यास आपण स्वतः उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत विखे यांनी फडणवीस सरकार आणि महापालिका आयुक्तांच्या कारभारावर ताशेरे ओढले.

कमला मिल प्रकरणी चौकशीचा फार्स केला जात असून आयुक्त या प्रकरणाची चौकशी करणार असतील तर चोराच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या दिल्या आहेत. आयुक्त अजोय मेहता हे स्वतःचा भ्रष्टाचार झाकून ठेवण्यासाठी प्रकरण उघड होऊ नये म्हणून आपल्यावर राजकीय दवाब येत असल्याचे म्हणत आहेत. खरेतर मेहतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, असा हल्लाबोल विखे यांनी केला.

भीमा कोरगाव प्रकरणावर सरकारने वेळीच कारवाई केली असती तर पुढचा प्रसंग टळला असता. राज्य सारकरच्या पुढाकाराने ही दंगल झाली. मराठा- दलित समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले गेले. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी विखेंनी केली.