कमल हसन आणि हिंदू आतंकवाद

0

अर्थात् हिंदुत्वद्वेष प्रकट करणारे कमल हसन यांचे हे काही पहिलेच विधान नाही. याआधीही त्यांनी हिंदूंचा धर्मग्रंथ असलेल्या महाभारतावर अभ्यासहीन टीका केली होती. ‘महाभारतामध्ये पुरुषांनी द्युत खेळताना द्रौपदीला एक प्यादे म्हणून वापरले. एका महिलेचा द्युतामध्ये वस्तू म्हणून वापर करण्याभोवती जे पुस्तक घुटमळते, त्याचा (महाभारताचा) भारतामध्ये आदर आणि सन्मान होतो ! हे लाजिरवाणे आहे’, असे वक्तव्य हसन यांनी केले होते. उच्च जातीतील हिंदू आता युवा वर्गावर सनातन धर्म थोपवू लागले आहेत, असे तारेही त्यांनी तोडले होते.

जिहादी आतंकवादावर भाष्य करणार्‍या ‘विश्‍वरुपम’ या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर हसन यांना वास्तवाची जाण असल्याची भावना हिंदूंमध्ये निर्माण झाली होती; पण हिंदुत्वनिष्ठ संघटना तसेच महाभारत यांच्याविषयीची त्यांची कलूषित विधाने ऐकल्यानंतर कुणाचाही भ्रमाचा भोपळा क्षणात तुटेल. विश्‍वरूपमचा पुढचा भाग (सिक्वेल) वर्ष 2017 च्या अखेरीपर्यंत येणार असल्याचे सांगितले जाते. दाक्षिणात्य कलाकार उतरत्या काळात राजकारणात प्रवेश करण्याची जुनी परंपरा आहे. त्यामुळे हसन यांचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांमधील कथित आतंकवादाचे विधान म्हणजे विश्‍वरूपम-2 ची अथवा राजकीय प्रवेशासाठीची पार्श्‍वभूमी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंदुत्वनिष्ठ संघटना आतंकवादी असत्या, तर वास्तविक कमल हसन यांच्या विधानामध्येच एक प्रकारे त्यांच्या वक्तव्याचे खंडन लपले आहे. कारण जर हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये खरेच आतंकवाद घुसलेला असता, तर असे वक्तव्य करण्याचे धारिष्ट्य कुणालाही झाले नसते. आज संपूर्ण जग इस्लामी आतंकवादाने होरपळत आहे. स्वतः कमल हसन यांनीही विश्‍वरूपम् चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी वर्ष 2013 मध्ये धर्मांध संघटनांची आक्रमक भूमिका अनुभवली होती. त्यांच्या दबावापोटी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र असूनही हसन यांना विश्‍वरूपममधील पाच दृश्ये ‘म्युट’ करावी लागली होती. याच्या अगदी उलट अनुभव हिंदूंना येतो. एखाद्या चित्रपटातून धार्मिक भावना दुखावल्याविषयीचा आक्षेप असेल, तर चित्रपटातील दृश्ये वगळणे सोडाच, हिंदूंच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्याचीही कुणाची भूमिका नसते. ‘पीके’सारख्या चित्रपटातून हिंदूंच्या देवतांची यथेच्छ टिंगलटवाळी होते, बाजीराव-मस्तानी चित्रपटातून पेशवेंचे शौर्य दाखवण्याऐवजी बाजीरावांची प्रतिमा प्रेमवीर म्हणून रंगवली जाते, रंग रसिया चित्रपटातून महान भारतीय कलाकार राजा रवि वर्मा यांची प्रतिमा मलीन केली जाते, बजरंगी भाईजान चित्रपटातून हनुमंताची विटंबना केली जाते, तर बँक चोरसारख्या चित्रपटातून हिंदू संतांची प्रतिमा मलीन केली जाते.

अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील. आगामी पद्मावती चित्रपटही याच पंक्तीतील. पद्मावती चित्रपटात इतिहासाच्या विकृतीकरणाचा भाग असल्याची शंका असल्याने त्याला विरोध होत आहे. चित्रपट, नाटक, विज्ञापने, पुस्तके, भाषणे यांच्या माध्यमातून हिंदूंची श्रद्धास्थाने तसेच आस्थाकेंद्रे यांचे हनन होत असूनही हिंदुत्वनिष्ठ संघटना सनदशीर मार्गानेच त्याचा विरोध करतात. याउलट महंमद पैगंबरांची कुणी टिंगल टवाळी केली, तर धर्मांध समूह हिंदूंप्रमाणे निवेदने, निदर्शने यांचा नाही, तर थेट प्राणघातक आक्रमणाचा मार्ग अवलंबतात. महंमद पैगंबरांचे कार्टून प्रसिद्ध करणार्या फ्रान्समधील चार्ली हेब्दो या साप्ताहिकाच्या कार्यालयावरील आतंकवादी आक्रमण हे त्याचेच उदाहरण, अशा घटना हिंदूंकडून होत नाहीत. कारण हिंदूंच्या संस्कारांतच मुळात तशी शिकवण नाही. हिंदूंना आतंकवाद पसरवायचे माहीत नाही; पण आतंकवाद संपवायचा कसा ते ठाऊक आहे; किंबहुना हिंदू राजांचा पराक्रमी इतिहास आतंकवाद संपवण्याचाच आहे. मोदींनीही सर्जिकल स्ट्राइक करून हे सिद्ध केले आहे.
कलम हसन यांच्यावरील विधानासाठी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कारण विश्‍वरूपम् बनवणार्‍यांचे सत्यस्वरूपम् जनतेला कळून चुकले आहे. अभिनेत्यांकडून होणारी अशी बेताल वक्तव्ये थांबवायची असतील, तर मनमानी वक्तव्ये करणार्‍यांना भारतीय दंडविधानसंहितेनुसार शिक्षा होणे आवश्यक आहे.

-चेतन राजहंस,
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387