तामीळनाडूच्या राजकारणात गेली काही महिन्यांपासून चर्चा-कुचर्चांना वाव दिल्यानंतर अभिनेते कमल हसन यांनी आपला राजकीय पक्ष काढणार असल्याची योजना असल्याचे जाहीर केले आहे. दि क्विंट या संकेतस्थळासाठी कमल हसन यांनी सुभाष के. झा यांना मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. होय, मी त्या दिशने विचार करत आहे. हौस म्हणून नाही तर मजबुरी म्हणून. राजकारणातील माझ्या सुधारणेच्या लक्ष्यांना पाठिंबा देईल असे व्यासपीठ सध्याचा कोणता राजकीय पक्ष पुरवेल, असा प्रश्न त्यांनी केला. आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असल्याच्या चर्चेला हसन यांनी नकार दिला. कमल हसन यांनी गेली अनेक महिने राजकीय टीका-टिप्पणी करून सत्ताधारी अण्णा द्रमुक सरकारला धारेवर धरले होते. मात्र, स्वतःचा राजकीय पक्ष काढणार असल्याच्या चर्चेला दुजोरा देण्याची हसन यांची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला पक्ष काढणार असल्याचे संकेत दिले होते. हसन हे फॅसिझमविरोधातील माकपच्या सभेत सहभागी होणार, अशी चर्चा होती. मात्र, त्याही बातमीचे कमल हसन यांनी ट्वीटरवरून खंडन केले होते.