पिंपरी-चिंचवड : आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाचे ‘कमळ’च फुलले असून, सत्तेची हॅट्ट्रीक साधण्याची स्वप्ने पाहणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बाजार उठवत मतदारांनी ‘परिवर्तन’ घडविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक लक्ष घालून पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दोन वर्षांपासून आखलेल्या रणनीतीला मोठे यश मिळाले. माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अजित पवार यांचा अतिआत्मविश्वास व आत्मविश्वास गमावलेली फौज यामुळे राष्ट्रवादीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणि मतदानात 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तेचे गणित फसले आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तांतराच्या बाजूने कौल देत मतदारांनी नवा इतिहास घडविला. भाजपने तब्बल 78 जागा जिंकत निर्विवाद बहुमत प्राप्त केले असून, राष्ट्रवादीला 35, शिवसेनेला 9, मनसेचे शहरप्रमुख सचिन चिखले स्वतः विजयी व इतर पाच अशा जागा प्राप्त झाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचा अक्षरशः सुफडा साफ झाल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्र्यांचा पवार काका-पुतण्याला जोरदार धक्का!
लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून खेचून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार काका-पुतण्यांना जोरदार दणका दिला आहे. त्यासाठी त्यांनी खास रणनीती आखून काट्याने काटा काढला. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या खांद्यावर भाजपच्या शहराध्यक्षपदाची धुरा देतानाच, त्यांनी अपक्ष आमदार महेश लांडगे यांनाही भाजपमध्ये खेचून आणले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांनाही पक्षात घेऊन पवारांची सगळी समीकरणे त्यांनी अक्षरशः उलटवली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अक्षरशः खिळखिळी झाली होती. पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नेते योगेश बहल यांनीही उमेदवारी वाटप करताना योग्य समीकरणे न राखल्याने पक्ष या दारूण पराभवाला सामोरे जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या वारंवार येऊन धडकू लागल्याने शहरात भाजपचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास मात्र चांगलाच डळमळीत झाला होता. पिंपरी-चिंचवड शहराचा आपण कायापालट केला असल्यामुळे विकासकामांच्या जोरावर शहरवासी आपल्याला पुन्हा सत्ता देतील, या भ्रमात अजित पवार राहिले. मात्र ते त्यांच्या टीममध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात कमी पडले. राष्ट्रवादीच्या प्रचाराची सर्व धुरा पवार यांच्या एकट्याच्या खांद्यावर राहिली. माजी आमदार विलास लांडे व अण्णा बनसोडे यांनी शहर पातळीवर प्रचाराची सूत्रे हातात घेणे अपेक्षित होते, मात्र बनसोडे फारसे सक्रिय राहिले नाहीत आणि लांडे यांनी पुत्रप्रेमापोटी इंद्रायणीनगर प्रभागातच तळ ठोकला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विजयापर्यंत नेऊ शकेल, असा एकही स्थानिक नेता सक्रिय नव्हता. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला.
आता लालदिवा कुणाला?
भाजपकडून केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या उत्तरांनी मतदारांचे समाधान झाले नाही. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील विकासाचा वेग कायम ठेवू शकेल, याविषयी पिंपरी-चिंचवडकरांच्या मनात साशंकता असल्याचेच निवडणूक निकालांवरून स्पष्ट होत आहे. सत्तेच्या माध्यमातून केलेले काम प्रभावीपणे जनतेपुढे मांडण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडली. तिकीटवाटपात झालेल्या चुका आणि काही ठिकाणची प्रबळ बंडखोरी रोखण्यात आलेल्या अपयशामुळे अनेक ठिकाणी जागा गमावाव्या लागल्या. सत्तेचा पुरेपूर वापर करीत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आमदारांमध्ये जास्त नगरसेवक निवडून आणण्याची चुरस लावून दिली. त्याचा फायदा भाजपला झाल्याचे दिसून येते. दोन्ही आमदारांना प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या आश्वासनांबरोबर मंत्रिपदाचे प्रलोभनही आहे. दोघांमध्ये सत्तासंघर्ष होऊ नये म्हणून दोघांवर वेगवेगळ्या प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आयात उमेदवारांना संधी देण्यात आल्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांनी बंडांचा झेंडा उभारला होता, पण हे बंड शांत करण्यात पक्षाचे नेते यशस्वी झाले. आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये फक्त राष्ट्रवादीकडेच आर्थिकदृष्ट्या तसेच सर्वच अर्थाने तगडे उमेदवार असायचे, त्यांच्यापुढे भाजपचे उमेदवार कमकुवत ठरायचे यावेळी राष्ट्रवादीमधून आलेल्या अशा तगड्या उमेदवारांना भाजपने रिंगणात उतरविले आणि निवडून येण्याची क्षमता या एकाच निकषावर उमेदवारी वाटप झाले. त्यात भाजपचे उमेदवार सरस ठरले. भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे यांच्याबरोबर आझमभाई पानसरे, सदाशिव खाडे, एकनाथ पवार, नामदेव ढाके, अॅड. सचिन पटवर्धन यांच्यासह भाजपच्या कोर टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रचारयंत्रणा राबवून मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. राष्ट्रवादीच्या बंद पडलेल्या बँकेत तुमचे मत ठेवण्याऐवजी भाजपच्या बँकेत पाच वर्षांसाठी मत ठेवा, आम्ही शहराचा पाचपट विकास करून दाखवतो, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकरांना दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी त्यांना आता पार पाडावी लागणार आहे.
अनेक मातब्बरांचे राजकारण संपुष्टात;
शिवसेनेचे अमित गावडे ठरले जायंट किलर!
चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत देशात आणि राज्यात आलेल्या भाजपच्या लाटेत अनेक विद्यमान नगरसेवकांना तसेच मुरलेल्या राजकारण्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र याच वेळी काहींनी आपला आब सांभाळून पद राखण्यात यश मिळवले. दरम्यान, या निवडणुकीच्या निकालाने अनेकांचे राजकारण संपुष्टात आणल्याचे चर्चिले जात आहे. सहा वेळा नगरसेवक राहिलेले माजी महापौर आर. एस. कुमार, विद्यमान महापौर शकुंतला धराडे, भाऊसाहेब भोईर, भारती फरांदे, सचिन लांडगे, मारुती भापकर, सुलभा उबाळे, प्रतिभा भालेराव, मंदाकिनी ठाकरे, शांताराम भालेकर, धनंजय आल्हाट, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, नारायण बहिरवाडे, सीमा फुगे, राजेश पिल्ले, राजेश फलके, संदीप चिंचवडे, अनंत कोर्हाळे, राजेंद्र जगताप, सुषमा धनाजी खाडे, शुभांगी बोर्हाडे, अश्विनी सचिन चिखले, तानाजी विठ्ठल खाडे, शुभांगी जाधव, राहुल जाधव, सारंग कामतेकर, वैशाली तरस हे पराभूत झाले आहेत. महापालिकेच्या सलग सहा निवडणुका जिंकून सुमारे तीस वर्षे निगडी प्राधिकरण भागाचे प्रतिनिधीत्व करणारे माजी महापौर आर. एस. कुमार यांना पहिल्याच लढतीत अस्मान दाखवून शिवसेनेचे युवा अधिकारी अमित गावडे ‘जाएंट किलर’ ठरले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, कुमार हे चक्क तिसर्या क्रमांकावर फेकले गेले. अत्यंत चुरशीच्या समजल्या गेलेल्या या लढतीमध्ये शिवसेनेने अमित गावडे या तरुण शिवसैनिकाची कोरी पाटी मतदारांपुढे धरली आणि शिवसेनेचा हा प्रयोग यशस्वी झाला. आर. एस. कुमार यांच्यासमोर आतापर्यंत पी. डी. पवार, सदाशिव ढोणे, रवींद्र हिंगे, मकरंद ढेरे, गजानन गवळी, बाळा शिंदे, अरुण थोरात, सुरेश लिंगायत, तात्या कदम, शंकर काळभोर, मनोज शिंदे, बापूसाहेब थोरात, लालासाहेब कदम, समीर जवळकर, आबा कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, प्रकाश ढवळे या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला होता. कुमार यांना कोणीही पराभूत करू शकत नाही, अशा पद्धतीची त्यांची प्रतिमा होती.
चर्चेतील चेहरे विजयी..
अत्यंत धक्कादायक निकाल लागलेल्या या निवडणुकीत राजू मिसाळ, जावेद शेख, वैशाली घोडेकर, राहुल कलाटे, अजित गव्हाणे, मंगला कदम, उषा वाघेरे, सुजाता पालांडे, डब्बू आसवानी, मोरेश्वर भोंडवे, दत्ता साने, नितीन लांडगे, विलास मडिगेरी, एकनाथ पवार, सचिन चिखले, अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, झामाबाई बारणे हे चर्चेतील चेहरे मात्र विजयी होण्यात यशस्वी ठरले आहेत. यंदा प्रथमच अनेक प्रभागात अत्यंत धक्कादायक असे निकाल लागले.
सगळे एक्झिट पोल फोल ठरले!
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला दुसर्या क्रमांकाच्या जागा मिळतील, असे विविध संस्थांचे एक्झिट पोल होते. परंतु, प्रत्यक्ष निकालानंतर हे पोल मतदारांनीच फोल ठरवले आहेत. मतदान कुणाला केले याचा अंदाज मतदारांनी येऊच दिला नाही. आम्ही राष्ट्रवादीलाच मतदान केले असे सांगणारे मतदार प्रत्यक्षात मात्र भाजपला मतदान करून मोकळे झाले होते. त्यामुळे मतदानपूर्व सर्वेक्षण करणार्या संस्थांचे अंदाज पूर्णतः फोल ठरले आहेत.
आ. लक्ष्मण जगतापांनी केलेला दावा सत्यात!
महापालिकेत सत्ता ही आमचीच येणार आहे, स्वबळावर सेंच्युरी मारू, असा दावा भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी 6 जानेवारीरोजी दैनिक जनशक्ति कार्यालयास दिलेल्या भेटीप्रसंगी केला होता. त्यानुसार, हा दावा सिद्ध करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. भाजपने स्वबळावर तब्बल 78 जागा जिंकल्या असून, निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. या विजयामागे त्यांच्या राजकीय रणनीतीचे यश कारणीभूत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारांचे जे ‘आउट गोइंग’ झाले त्याचा फटका पक्षाला निश्चितच बसला आहे.
– सुप्रिया सुळे, खासदार
पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे आपण यापूर्वीच सांगितले होते. राष्ट्रवादीचे जेवढे नगरसेवक आहेत, तेवढे भाजपचे येणार असल्याचे मी म्हटले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या महापालिकेवर भाजपचे कमळ फुलले आहे. शिवसेनेच्या भल्यासाठी त्यांच्यासोबत युती करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यांनी युती तोडली. त्याचा फायदा भाजपलाच झाला. आता पाच अपक्षदेखील आपल्या सोबतच आहेत.
– आ. लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष भाजप
मतदारांनी दिलेला कौल आपणास मान्य आहे. राष्ट्रवादीच्या कारभाराला मतदार कंटाळले होते. त्यांना पर्याय हवा होता. हा पर्याय त्यांनी भाजपच्या रुपाने निवडला आहे. आम्हाला 20 जागांची अपेक्षा होती. परंतु, आता दिलेला कौल आम्ही मान्य करत आहोत.
– खा. श्रीरंग बारणे, नेते शिवसेना