हडपसर । वडकी येथील श्री विघ्नेश्वरा एज्युकेशन सोसायटी संचलित, इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनजेमेंट अँड रिसर्च या व्यवस्थापनाचे शिक्षण देणार्या महाविद्यालयातील पीजीडीएम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी कमवा आणि शिका ही योजना अभिनवपद्धतीने राबविली. दिवसभर चाललेल्या या उपक्रमात 3 संघात मिळून 20 विद्यार्थी सहभागी झाले होते.
हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकीनाला, उरुळी देवाची साडी मार्केट आणि मगरपट्टा चौक अशा तीन ठिकाणी मुलांनी वेगवेळ्या दुकान, हॉटेल, वर्कशॉपमध्ये जाऊन मिळेल ते काम केले. पैसे कमविण्यासाठी प्रत्येक लोकेशनवर मुलांना 45 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. त्यामध्ये मुलांनी न लाजता झाडू काढणे, भेळ विकणे, वर्कशॉपमध्ये जाऊन काम करणे, साड्यांच्या दुकानात जाऊन साडी विकणे, अशी विविध कामे केली. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी उच्चशिक्षित असूनही पडेल ती कामे मुलांनी दिवसभरात केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना काम करत शिक्षण घेणार्या आर्थिकदृष्टया दुर्बल विद्यार्थ्यांची कैफियत कळाली. पैसे कमविण्यासाठी किती कष्ट करावे लागतात आणि मिळालेल्या पैशांचा वापर कसा करावा, या गोष्टी या उपक्रमाच्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना कळल्या. या उपक्रमाचा शेवट मगरपट्टा येथील सीझन मॉल येथे करण्यात आला. दिवसभरात कमाविलेले पैसे विद्यार्थ्यांनी अनाथ आश्रमात मदत म्हणून देण्याचे ठरविले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जपण्यास मदत होईल, असा विश्वास संस्थापक अध्यक्ष जयकिशन भुतडा यांनी व्यक्त केला. संचालिका डॉ. मंजू चोप्रा यांनी उपक्रम राबविला. यावेळी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.