कमांड हॉस्पिटल येथे अंडरपास बांधण्यास मंजुरी

0

पुणे : महापालिका परिसरातील एमएच (सीटीएस) प्रवेश ते न्यू कमांड हॉस्पिटल (एससी) या ठिकाणी अंडरपास बांधण्यासाठी 4 कोटी 16 लाख रुपये देण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. येथील एम.एच. (सीटीएस) प्रवेश ते न्यू कमांड हॉस्पिटल (एससी) या ठिकाणी अंडरपास बांधण्यासाठी पालिकेने निविदा मागविली होती. त्यासाठी एकूण पाच निविदा आल्या होत्या. त्यात ए.आर. कन्स्ट्रक्शन यांची चार कोटी सोळा लाख रुपयांची सर्वात कमी निविदा आली होती. पूर्वगणन पत्रकापेक्षा साडेसात टक्क्याने ही निविदा कमी आली आहे. या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने या ठिकाणी उड्डाणपूल करताना अंडरपास बांधण्याचे ठरविले होते. यासाठी बजेटमध्ये एक कोटीची तरतूद करण्यात आली होती. मग त्यासाठी 4 कोटी 16 लाख रुपये खर्च कसे करणार? असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला. त्यावर या कामासाठी खासदार अनिल शिरोळे आणि आमदारांनी निधी दिला आहे. पण पालिकेचे सर्वसाधारण सभेने ठरविलेल्या धोरणाविरोधात काम का करता? पालिकेचे काम नसतानाही प्रत्येक ठिकाणी पुणेकरांच्या करदात्याचे पैसे खर्च का केले जात आहे, असे प्रश्‍न बागवे यांनी उपस्थित केले.