नवी दिल्ली । पत्नी जर कमावती असेल आणि ती स्वत:ची उपजीविका करू शकत असेल, तरी तिला पोटगी मागण्याचा अधिकार आहे असा महत्त्वपूर्ण निकाल दिल्ली सत्र न्यायालयाने दिला आहे तसेच पत्नी कमावती असल्याने पोटगी देण्यास नकार देणार्या पतीस न्यायालयाने चागलेच झापले आहे.
सविस्तर वृत्त असे की, खटल्यातील महिलेचे जानेवारी 2015 मध्ये लग्न झाले होते. हुंडा दिला नाही म्हणून तिचा नवरा आणि सासरची मंडळी तिचा छळ करत होते. त्यामुळे अवघ्या पाच महिन्यांतच ती महिला माहेरी परतली. त्यानंतर दंडाधिकारी न्यायालयात तिने पोटगीसाठी अर्ज केला. मात्र, तिची पोटगीची मागणी दंडाधिकारी न्यायालयाने नामंजूर केली. विवाहिता पदवीधर असून ती नोकरी करून स्वत:चा उदरनिर्वाह चालवू शकते, असा तिच्या पतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून दंडाधिकारी न्यायालयाने तिची मागणी फेटाळली होती. पोटगी फेटाळण्याच्या निर्णयाविरोधात त्या महिलेने दिल्ली अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली. अतिरिक्त सत्र न्यायधीश विवेक कुमार गुलिया यांच्या न्यायासनासमोर या खटल्याची सुनावणी झाली. अंतिम निकालात न्यायालयाने महिलेची बाजू ग्राह्य धरत तिची पोटगीची मागणी योग्य असल्याचे स्पष्ट केले.
पती-पत्नीची फारकत झाल्यानंतर पतीकडून पोटगीची मागणी करण्यासाठी पत्नी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे परावलंबी असली पाहिजे, असे कायदा म्हणत नाही. आपण केवळ पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. शिवाय कोणतेही व्यावसायिक शिक्षण घेतलेले नाही. त्यामुळे चांगली नोकरी मिळवणे सहजशक्य नाही, असा युक्तिवाद पत्नीने केला. मात्र, पत्नीचा युक्तिवाद पतीला खोडून काढता आला नाही. त्यामुळे पत्नीला दरमहा 3 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने पतीला दिले आहे.