देवेंद्र शहा हत्याकांड : चोरगे, शिवतारेचा कसून शोध सुरु!
पुणे : प्रभात रोडवरील खळबळनजक देवेंद्रभाई शहा हत्याकांडातील प्रमुख आरोपी रवींद्र चोरगे व राहुल शिवतारे हे इस्टेट एजंट असून, एका वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारात शहा यांनी ठरलेले कमिशन वेळेवर न दिल्याने या दोघांनी त्यांना गोळ्या घातल्या असल्याची माहिती या हत्याकांडाचा तपास करणार्या पोलिस सूत्राने दिली आहे. विशेष बाब म्हणजे, चोरगे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून, त्याच्याविरोधात फरसखाना पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे. या दोघांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरु केला असून, त्यासाठी विविध पथके रवाना केली आहेत. या दोघांनाही पैशाची नितांत गरज असताना शहा यांनी त्यांना पैसे दिले नाही; उलटपक्षी अन्य एका जमिनीचा व्यवहार केला, त्यामुळे चिडून जाऊन या दोघांनी त्यांना गोळ्या घालून मारल्याचेही पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पुण्यासारख्या शहरात बांधकाम व्यावसायिकाचा खून झाल्याने शिवसेनेने राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. बिल्डरची हत्या ही राज्य सरकारसाठी धोक्याची घंटा असल्याची टीका शिवसेनेने केली. या संदर्भात जळजळीत अग्रलेखच ‘सामना’मधून संपादक उद्धव ठाकरे यांनी लिहिला आहे.
मारेकर्याचे अंडरवर्ल्ड कनेक्शन
या हत्याकांडाचा तपास करणार्या पोलिस पथकाने सांगितले, की चोरगे व शिवतारे हे रिअल इस्टेट एजंट आहेत. पौड येथील एका वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारात त्यांचे काही कमिशन ठरले होते. परंतु, हे कमिशन देण्यास शहा हे टाळाटाळ करत होते. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून शहा व या दोन मारेकर्यांत वाद सुरु होता. तसेच, कमिशनदेखील वाढवून देण्यात यावे, असा घोषा या दोघांनी शहा यांच्याभोवती लावला होता. पौड येथील वादग्रस्त जागा या दोघांनीच शहा यांच्यासाठी खुली करून दिली होती. या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमीही पोलिस तपासत असून, या दोघांपैकी एकाची मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये उठबस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या अंडरवर्ल्ड टोळीबाबत मात्र माहिती देण्याचे पोलिसांनी टाळले. देवेंद्रभाई शहा हे जमिनी विकत घेणे, त्या विकसित करणे आणि विकणे असा व्यवसाय करत होते, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
राज्यात बिल्डर, उद्योगपतींचा जीव धोक्यात!
‘सामना’तील अग्रलेखात ठाकरे यांनी नमूद केले, की भाजप हे केंद्र व राज्यामध्ये उद्योगपती, बिल्डर, आणि व्यापारीवर्गाच्या जोरावरच निवडून आले आहे. परंतु, या लोकांना आता त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. मारेकरी पुण्यात खुलेआम फिरत आहेत. त्यांना वेळीच पकडले गेले नाही तर सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे बदनाम होईल. देवेंद्र शहा यांची हत्या राज्य सरकारसाठी धोक्याची घंटा असून, ज्या लोकांनी भाजपला सत्ता देण्याची चूक केली तेच आता मारले जात आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था चांगली असल्याचे फडणवीस सांगत असले तरी ते किती खोटे बोलत आहेत, हेच या हत्याकांडाने चव्हाट्यावर आले आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी या अग्रलेखातून केली आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारेकर्यांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी या आरोपींच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना केली होती. परंतु, अद्याप त्यांचा ठावठिकाणा पोलिसांना कळू शकला नव्हता.