कमी दराने वीज देण्यासाठी प्रयत्नशील

0

पुणे । सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प वाढवून विजेचा दर कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. वीज दर 3 रुपये 20 पैसे करणार असून यासाठी सरकार नवनवीन प्रकल्प राबवणार आहे, असे आश्‍वासन राज्याचे मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथे दिले. महाराष्ट्र ऊर्जा विकास अधिकरणअंतर्गत एक मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पुणे राजभवन येथे राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुणे महापालिकेच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे आदी उपस्थित होते.

1 हजार मेगावॅट ऊर्जेची बचत
अनावश्यक वापर होत असलेल्या 1 हजार मेगावॅट विजेची बचत करण्याचे धोरण राज्य शासनाकडून आखण्यात आले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. अपारंपारिक ऊर्जास्रोतातून वीज निर्मिती केल्यामुळे औष्णिक ऊर्जा निर्मितीतून होणारे प्रदूषण थांबविता येईल.अपारंपारिक ऊर्जेचा दर 25 वर्षे कायम राहतो, हा त्याचा मोठा फायदा आहे. त्यामुळेच आगामी काळात जास्तीत जास्त सौरऊर्जेच्या वापरावर भर देण्यात येईल. तसेच महाराष्ट्र सौरऊर्जेचा वापर करणारे सर्वात मोठे राज्य बनावे, अशी इच्छा असल्याचे विद्यासागर राव यांनी सांगितले.

नवनवीन प्रकल्पांची निर्मिती
औष्णिक ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण होणारे प्रदूषण रोखण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अपारंपारीक ऊर्जा स्तोत्र निर्मितीचे मोठे काम ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी हाती घेतले आहे. आतापर्यंत 8 कोटी एलईडी बल्ब लावण्यात आले असून अजूनही 8 कोटी बल्ब लावण्याचे काम सुरू आहे. हीच वीज 3 रुपये 20 पैशांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी राज्यसरकार नवनवीन प्रकल्पांची निर्मिती करणार आहे. या उपक्रमामुळे राज्यात एक ऊर्जात्मक वातावरण निर्माण होईल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.