कमी वीजेच्या पंपांनाच जोडणी

0

अकोला । विजेची बचत व्हावी यासाठी यापुढे केवळ ऊर्जा कार्यक्षम (एनर्जी इफिशियन्ट) कृषी पंप घेणार्‍या शेतकर्‍यांनाच नवीन वीज जोडणी देण्यात येईल. मंजूर भारापेक्षा अधिक वीज खेचणारे जुने पंप असलेल्या शेतकर्‍यांकडून ते घेऊन त्यांना कमी वीज खेचणारे नवीन पंप शासनाकडून 50 टक्के अनुदानावर देण्यात येतील, अशी घोषणा ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केली. महावितरणच्या अकोला परिमंडळअंतर्गत तीन उपकेंद्र व अकोट विभागाचा लोकार्पण सोहळा विद्युत भवनच्या प्रांगणात पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून बावनकुळे बोलत होते. शेतकर्‍यांच्या अडचणी वाढविण्यापेक्षा सरकारने खात्रीचा वीज पुरवठा द्यावा, अशा प्रतिक्रिया व्यक्त होते आहेत.

अवघा गोतावळा कौतुकाचा
पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी शहरातील वीज समस्यांकडे उर्जामंत्र्यांचे लक्ष वेधले. अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी प्रास्ताविकातून महावितरणच्या कामांची माहिती दिली. त्यानंतर आमदार रणधीर सावरकर यांनी भाजपा सरकारच्या कार्यक्षम प्रणालीमुळे वीज समस्यांचे प्रमाण कमी झाल्याचे समाधान व्यक्त केले. येणार्‍या काळात कृषीपंपाची प्रतीक्षा यादी रद्द होऊन सर्वांना मुबलक वीज मिळेल असा आशावाद व्यक्त केला. खासदार संजय धोत्रे यांनीही विजेच्या प्रश्नावर सरकारच्या कामगिरीचे कौतुक करीत उर्जामंत्री धडाडीने निर्णय घेत असल्याचे गौरवोद्गार काढले.

20 कोटींच्या एलईडीचे काम रद्द करा!
20 कोटींच्या निधीतून शहरात उभारलेल्या जाणार्‍या एलईडी पथदिव्यांचे काम केंद्र शासनाच्या ‘ईईएसएल’ कंपनीला का दिले नाही, असा सवाल करीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काम रद्द करण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल, आयुक्त अजय लहाने यांना दिले. त्यावर एलईडीच्या कामाची निविदा मंजूर करून कंपनीने कामदेखील सुरू केल्याची माहिती महापौर अग्रवाल यांनी दिली असता आजपर्यंत कंपनीने जेवढे काम केले, त्या बदल्यात मोबदला देऊन काम रद्द करण्याची सूचना ऊर्जा मंत्र्यांनी दिली.

जनता दरबाराचा धसका
ऊर्जामंत्र्यांच्या दरबाराचा धसका महावितरणच्या अधिकार्‍यांनी घेतला आहे. जनता दरबारात आपली नाचक्की होऊ नये, यासाठी महावितरणच्या काही अधिकार्‍यांनी दोन दिवसांपासून तक्रारकर्त्यांना ते या दरबारात येऊ नये, अशी गळ घालत होते, असा खुलासा काही तक्रारकर्त्यांनी ऊर्जामंत्र्यांच्या समक्ष केल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार ऐकून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे संतप्त झाले व त्यांनी संबंधित अधिकार्‍यांचा समाचार घेऊन त्यांना ‘शो कॉज’ बजावण्याचे आदेश दिले. महावितरणच्या अधिकार्‍यांचा कामचूकारपणा लपविण्याचा हा संतापजनक प्रकार समोर येवूनही वरिष्ठाधिकारी गप्प बसलेले आहेत.