‘कुलगुरू’ आता करणार शहर विकासावर पीएचडी
राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू सार्थ उपाधी
भोसरीः निवडणुकीमध्ये विरोधकांनी शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करून राजकारण केले. त्यामुळे नाउमेद न होता, खचून न जाता पुन्हा त्यांनी शिक्षणाचा श्री गणेशा सुरु केला. द्विपदवीधर होण्यापर्यंत त्यांनी मजल मारली असून आता लवकरच शहराच्या विकासावर ‘पीएचडी’ करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी लवकरच ते तयारी सुरू करणार आहेत. ही गोष्ट आहे राजकीय विद्यापीठाचे कुलगुरू आणि शहरातील चतुर राजकारणी अशी ओळख असणार्या भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची. भोसरीतील एका खासगी शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाला ते उपस्थित होते. मात्र या वयात शिक्षण घेऊन द्विपदवीधर होऊन जगताप यांनी दिलेल्या उपाधीला शोभेल असेच शिक्षण विलास लांडे घेत आहेत हे या निमित्ताने दिसून आले आहे.
शिक्षणाचा मुद्दा केला उपस्थित
मागच्या निवडणुकीवेळी शिक्षणाचा मुद्दा उपस्थित मागील लोकसभा निवडणुकीत विलास लांडे यांच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराने विलास लांडे यांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करून ‘सातवीपर्यंत शिक्षण झालेला उमेदवार लोकसभेत काय प्रश्न विचारणार?’ असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी निवडणुकीतील प्रचारात हा कळीचा मुद्दा ठरला होता. मात्र त्या वेळच्या परिस्थितीत विलास लांडे यांना शिक्षण घेणे शक्य नव्हते. दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील विलास लांडे यांना शहरातील राजकीय विद्यापीठचे कुलगुरू अशी उपाधी दिली होती. ‘शहराच्या राजकारणाचे विद्यापीठ भोसरीत असून त्याचे कुलगुरू लांडे आहेत’, असे जगताप म्हणाले होते.
शिक्षणाला वयाची अट नसते
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विलास लांडे म्हणाले की, आपल्या कमी शिक्षणाबद्दलची खंत कायम मला टोचत होती. मला अजून शिकायची इच्छा होती. मात्र डगमगून ना जाता वयाच्या पंचेचाळिशीतही मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेऊन अभ्यासाला सुरुवात केली. जिद्दीने ते पदवीधर झाले. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासावर पीएचडी करावी, असे बरेच दिवसांपासून मनात होते. परंतु, त्यासाठी द्विपदवीधर होणे गरजेचे होते. त्यासाठी पुन्हा जोमाने अभ्यास सुरु केला. आता द्विपदवीधर होण्याच्या शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा द्यावयाची आहे. त्यात ते नक्कीच उत्तीर्ण होतील. त्यानंतर लगेच पीएचडीच्या अभ्यासाला ते सुरुवात करणार आहेत. शिक्षणाला वयाची अट नसते. कोणत्याही वयात माणूस शिक्षण घेऊ शकतो. कारण तो आयुष्यभर विद्यार्थीच असतो. आपल्या कमी लेखणार्यांना मी शिक्षणाने उत्तर दिले आहे.