गृहोपयोगी वस्तू जळून खाक : सुदैवाने जीवितहानी टळली
बोदवड : तालुकयातील करंजी येथील योगेश दगडू निकम हे शेतात गेल्यानंतर त्यांच्या कुडाच्या घराला अचानक आग लागल्याने गृहपयोगी वस्तू, अन्नधान्य व 50 हजार रोख रक्कम असे सर्व मिळून सुमारे एक लाख दहा हजारांचे नुकसान झाले. सोमवारी सकाळी ही घटरना घडली.
रोख रक्कमही खाक
निकम यांचे कुडाचे घर असून त्यांच्या घरातील कपाट, पलंग, गादी, टीव्ही कुलर, फ्रीज, सायकल, शिलाई मशीन, सर्व अन्नधान्य, जेवणाची भांडी, कपडे, घरावरील पत्रे, मोबाईल असे सर्व साहित्य तसेच वरणगावात म्हैस विकून आलेली 50 हजारांची रोकडही जळाली. अचानक ओढवलेल्या या संकटाने निकम कुटुंबावर मोठे संकट कोसळून कुटुंब रस्त्यावर आले आहे. करंजी येथील तलाठी मोनिका गोविंद बडगुजर व सर्कल एम.एस.पाटील यांनी घटनास्थळ गाठून नैसर्गिक आपत्तीचा पंचनामा करून तहसीलदारांकडे अहवाल सादर केला. माणुसकीच्या नात्यातून सर्कल एम.एस.पाटील यांनी निकम यांना दोन हजार रुपयांची मदत केली. निकम यांनी प्रशासनाकडून भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.