नवापूर। तालुक्यातील करंजी खु. (तुलजाफळी) येथील अल्पवयीन 14 वर्षीय मुलीवर संशयित युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली आहे. याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात 376 (2) आयसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 3, 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपीचा शोध सीसीटीव्ही कॅमेराद्वारे करण्यात येत आहे. मात्र, संशयित आरोपी अद्यापपर्यंत मिळून आलेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सविस्तर असे, नवापूर तालुक्यातील येथील रहिवासी असलेला रोहित नावाच्या युवकाने शनिवारी दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलीला दूचाकीवर बसून फिरायला नेतो, असे सांगत तीन टेंबा परिसरातून लालबारी परिसरातील ऊसाच्या शेतात नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. बालिकेला प्रचंड वेदना होत असल्याने तिला उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, नवापूर उपजिल्हा रुग्णालयात डायनालोजिटीक महिला डॉक्टर नसल्यामुळे तिला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोहेकॉ. कैलास तावडे करीत आहे.