करंजी पाचदेवळीच्या गरोदर विवाहितेचा मृत्यू ; पतीसह सासू-सासर्‍यांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ- बोदवड तालुक्यातील करंजी पाचदेवळी येथील गरोदर विवाहितेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पतीसह सासू-सासर्‍यांविरुद्ध शनिवारी रात्री वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रियंका गोपाळ पाटील (20) या विवाहितेने गुरुवारी रात्री 9.30 वाजता गळफास घेवून आत्महत्या केली होती. मयत विवाहितेची आई सविता प्रकाश इंगळे यांनी मुलीला सासरच्यांनीच छळ करून मारल्याचा आरोप शुक्रवारी सकाळी वरणगाव पोलिस ठाण्याबाहेर केला होता.

अखेर तिघांविरुद्ध गुन्हा ; दोघांना अटक
बोदवड येथील माहेर व करंजी पाचदेवळी येथील सासर असलेल्या प्रियंकाचा अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच गोपाळ पाटील या तरुणाशी विवाह झाला होता तर ही विवाहिता गरोदरही होती. कॅमेरा घेण्यासाठी विवाहितेने माहेरून पैसे आणावेत म्हणून तिचा छळ करण्यात आला व छळास कंटाळून तिने गुरूवारी रात्री आत्महत्या केल्याची तक्रार मयताची आई सविता प्रकाश इंगळे (बोदवड) यांनी शनिवारी रात्री वरणगाव पोलिसात दिल्यावरून पती गोपाळ शालिग्राम पाटील, सासरा शालिग्राम दयाराम पाटील, सासु निर्मलाबाई शालिग्राम पाटील यांच्याविरुद्ध भादंवि 306 अन्वये वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, आरेापी पतीसह सासर्‍यास पोलिसांनी अटक केली आहे.