बारामती: तालुक्यातील करंजे येथील श्री क्षेत्र सोमेश्वर येथील श्रावणी यात्रेनिमित्त श्रावणातल्या पहिल्या सोमवारी भाविकांची गर्दी मोठया प्रमाणात झाली. हजारो भाविकांनी रांगा लावून सोमेश्वरच्या दर्शनाचा लाभ घेतला. बारा ज्योर्तिलिंगा पैकी एक असलेल्या सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथांचे प्रतिरूप म्हणून श्री सोमेश्वरची ओळख निर्माण झाली. सतीचे वाण या चित्रपटाने राज्यात ओळखले गेलेले हे तीर्थक्षेत्र अत्यंत नव्या स्वरूपात उभारण्यात आले आहे. महाशिवरात्र व श्रावण महिन्यात या ठिकाणी संपूर्ण महिनाभर मोठी यात्रा भरत असते.
या वर्षीच्या पहिल्याच सोमवारी पहाटे पासून मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. रात्रीच्या बारा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते पुजा पार पडली. या वेळी श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष रामदास भांडवलकर, सचिव हेमंत भांडवलकर वाघळवाडीचे संदिप साळुंखे, सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आदि मान्यवर उपस्थित होते. साळुंखे व काकडे यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी सोमेश्वराला पाऊस पाडण्याचे साकडे घातले.