करकरेंचे बुलेटप्रूफ जॅकेट कचर्‍यात टाकले

0

मुंबई । एटीएस प्रमुख असलेले हेमंत करकरेंच्या बुलेटप्रूफ जॅकेटप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. करकरे यांनी वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट जे. जे. रुग्णालयातील सफाई कामगाराने कपड्यासोबत काढत कचर्‍यात टाकल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती.

शेवटपर्यंत जॅकेट सापडलेच नाही
मुंबई पोलिसांकडे एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या बुलेटप्रूफ जॅकेटची माहिती मागितली होती. मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी सुरेश सपकाळ यांनी त्याबाबत खुलासा कळवला आहे. ‘माजी पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांनी मुंबई हल्ल्यादरम्यान वापरलेले बुलेटप्रूफ जॅकेट जखमी झाले तेव्हा त्यांच्या शरीरावर तसेच होते. करकरे जखमी झाल्याने त्यांना जेजे रुग्णालय येथे उपचारादरम्यान दाखल करण्यात आले. तेव्हा तेथील सफाई कामगाराने त्यांच्या अंगावरील बुलेटप्रूफ जॅकेट आणि कपडे अंगावरून काढून ते कचर्‍यांमध्ये टाकले. सदर बुलेटप्रूफ जॅकेटचा सर्वतोपरी शोध घेण्यात आला. परंतु, ते शेवटपर्यंत मिळून आले नाही.’

बुलेटप्रूफ जॅकेट न सापडणे आणि कचर्‍यात टाकणे, ही बाब निष्काळजीपणाचा कळस आहे. सध्या बुलेटप्रूफ जॅकेटची गुणवत्ता आणि मजबुतीचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. करकरे यांनी वापरलेल्या बुलेटप्रूफ जॅकेटची तपासणी झाली असती, तर नक्कीच बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी आणि झालेला गोलमाल उघडकीस आला असता.
– अनिल गलगली, आरटीआय कार्यकर्ते.