१६ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याची करण्यात आली सूचना
हैदराबाद : सेवा कर न भरल्या प्रकरणी भारताची महिला दुहेरीमधील अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाला सेवा कर विभागाने नोटीस बजावली आहे. सानिया मिर्झाने सेवा कर चुकवल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. हैदराबादमधील सेवा कर विभागाच्या प्रधान आयुक्तांनी ६ फेब्रुवारीला या प्रकरणी सानियाला समन्स बजावले. तिला १६ फेब्रुवारीला हजर होण्यास सांगितले आहे.
हजर होण्यासाठी समन्स
केंद्रीय अबकारी कायद्यातंर्गत सानियाला हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. आपण करचुकवेगिरी केली नाही हे सिद्ध करण्यासाठी सानियाला काही कागदपत्रे ही सादर करावी लागू शकतात. एकूण २० लाख रुपयांचा कर तिने भरलेला नाही. ६ फेब्रुवारी रोजी ही नोटीस पाठविण्यात आली असून १६ फेब्रुवारीपर्यंत तिला उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे. प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधीमार्फत हे उत्तर देता येता येणार आहे. जर कागदपत्रे दाखविण्यास सानिया मिर्झा असमर्थ राहिली तर भारतीय दंड विधानानुसार तिच्यावर कारवाई होईल असे नोटीसमध्ये म्हटले गेले आहे. तुमच्याजवळ याबाबत नक्कीच स्पष्टीकरण असेल तेव्हा स्वतः हजर राहून किंवा प्रतिनिधीमार्फत तुमची बाजू मांडावी असे या नोटीसमध्ये लिहिले असल्याचे पीटीआयने म्हटले आहे.
तर होऊ शकते शिक्षा
जर तुम्ही समन्सला प्रतिसाद दिला नाहीत. जाणीवपूर्वक गैरहजर राहिलात, पुरावे दिले नाहीत तर आयपीसीच्या तरतुदीअंतर्गत तुम्ही शिक्षेला पात्र आहात असे सानियाला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. सानिया मिर्झाने वित्त कायदा १९९४ नुसार सेवा कर बुडवल्याप्रकरणी चौकशी सुरू झाली असून तुमच्याजवळ याबाबतची जी कागदपत्रे आहेत ती घेऊन यावी असे प्रमुख सेवा कर अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. केंद्रीय उत्पादन शुल्काच्या वित्त कायदा १९९४ नुसार ही कारवाई होत असून या संदर्भात तुमचे निर्दोषत्व सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करण्यात यावी असे सेवा कर विभागाने म्हटले आहे.