करचुकव्यांची खैर नाही!

0

कितीही पळा, शोधून काढूच : मोदी सरकारने ठणकावले

नवी दिल्ली : प्राप्तिकर बुडविणार्‍या करचुकव्यांची नव्या वर्षात काही खैर नाही. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने या करचुकव्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. करचोरी करून तुम्ही एखाद्या वेळेस पळून जाल, पण दीर्घकाळ लपून बसू शकणार नाहीत. तुम्ही किती लांब पळाल याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. कितीही दूर पळा, आम्ही तुम्हाला शोधूनच काढू, असा स्पष्ट इशारा मोदी सरकारने करचुकव्यांना दिला आहे. या करचुकव्यांना पकडण्यासाठी सरकारने बिग डाटाचा आधार घेतला. मात्र त्यानेही समाधान न झाल्याने करचुकव्यांची नावे समजण्यासाठी सरकारने प्राप्तिकर कायद्याच्या नियमांमध्येच बदल केल्याचेही सूत्रांनी सांगितले.

प्राप्तिकर कार्यालय देणार नोटीस
नव्या नियमांमुळे बँकींग, इश्युरन्स आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत जमा करण्यात आलेल्या डाटाचा करचुकव्यांचा शोध घेण्यासाठी वापर करण्याचे अधिकार बँक अधिकार्‍यांना मिळाले आहेत. या नव्या बदलामुळे पळून गेलेल्या किंवा लपून बसलेल्या करचुकव्यांना प्राप्तिकर कार्यालायातून नोटीस पाठविता येणार असून, त्यांना कर भरणा करण्यास सांगण्यात येणार आहे. या आधी करदात्यांनी दिलेला पॅन नंबर आणि आयटीआरमधील पत्त्यावरून करचुकव्यांचा पत्ता शोधून काढून त्यांना नोटीस बजावण्यात येत होती. त्यामुळे वारंवार पत्ता बदलणार्‍या करचुकव्यांना नोटीस पाठवणे अधिकार्‍यांना शक्य होत नव्हते. त्यांना जुन्याच पत्त्यावर नोटीस पाठवली जात होती. या नव्या बदलामुळे राहण्याची कितीही ठिकाणे बदलली तरी आता त्यांना पकडणे शक्य होणार आहे.