जव्हार : शेकडो वर्षाची आदिवासी परंपरा व संस्कृतीचे प्रतीक असलेला *जगदंबा माता उत्सव अर्थात बोहाडा हा करढण(तुळजापूर) ता.जव्हार जिल्हा पालघर या गावी उत्साहात साजरा करण्यात येतो. तसेच हा उत्सव जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात काही भागात साजरा केला जातो.आजही या ठिकाणी आदिवासी कला,परंपरा व संस्कृतीचे जतन केले जाते दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जगदंबा उत्सव~(बोहाडा)~ साजरा केला जातो.रात्रीच्या वेळेस या उत्सवास प्रारंभ होतो.विविध देवदेवतांचे मुखवटे व वेश परिधान करून आदिवासीचे पारंपारिक वाद्य सांबळाच्या तालावर एका विशिष्ट पद्धतीने गणपती, सरस्वती, मारुती, श्रीकृष्ण, महादेव, इंद्रदेव, शिवाजी, रामताटी, ब्रम्हदेव, भीम, चारणींन, खंडेराव, इंद्रजीत, रावण, राम-लक्ष्मण मैषाशुर, दैताशूर, जगदंबा माता व इतर ६२प्रकारची सोंग संध्याकाळी ७ ते सकाळी ८ वाजेपर्यंत नाचविली जातात. विशेष म्हणजे पहाटे ३ ते ५ वेळी राम लक्ष्मण चे आगमन होते राम वनवासात असताना त्यानी कोणत्या प्रकारे संकटांचा सामना केला,त्यांच्यावर कोणी आक्रमण केले,सीतेचे अपहरण कसे केले,जटायू नी कसा प्रतिकार केला,लक्ष्मण जखमी असताना हनुमान कशी मदत करतो,रावणाचा वध कसा केला जातो. इत्यादी विविध प्रकारचे दृश्य रूपामध्ये नाट्यरूंपातर करून दर्शन घडवले जाते.सकाळी बहुप्रतिक्षित जगदंबा मातेचे आगमन होते महाशक्तीशाली म्हैसासूर व दैत्यशूर यांची लढाई होऊन त्यांचा वध केला जातो. बाहेर गावावरून आलेले सर्व भाविक, गावातील सर्व माणसे देवीची पूजा करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी,एक श्रद्धा म्हणून देवीला साकडे घालतात. नंतर उत्सवाची सांगता होते.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पालघर, ठाणे, नाशिक, मुंबई, व दादरा नगर हवेली* या भागातून मोठ्या संख्येने विविध जाती धर्माचे भाविक येऊन या उत्सवाचा आनंद घेत असतात.मनोरंजनाचा भाग म्हणून या ठिकाणी लहान-मोठी पाळणे रात्रभर चालु असतात.. विरंगुळा म्हणून लहान मुले तसेच मोठी माणसे याचा आनंद घेत असतात.विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, तसेच विविध प्रकारची दुकानेही असतात,
तसेच या उत्सवास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन येथील आयोजकांनी केले आहे।