मुंबई । अलीकडेच येऊन गेलेल्या ओखी चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा वसई-विरार भागाला बसला, तरी रविवारी रंगलेल्या सातव्या इंडियाबुल्स होम लोन्स वसई-विरार मॅरेथॉन स्पर्धेत या वादळाचा नामोनिशाणही पाहायला मिळाला नाही. सर्वोत्तम तयारी, डीजेच्या तालावर ठेका धरत आणि सकाळच्या वेळी पडलेल्या धुक्यातून वाट काढत धावणार्या विविध राज्यांतून आलेल्या अॅथलिट्सनी वसईकरांची मने जिंकली. ओखी वादळामुळे गेल्या काही दिवसांपासून वसई-विरार पट्ट्यामध्ये वातावरण थंड असले, तरी सकाळच्या वेळी असलेल्या आर्द्रतेमुळे स्पर्धाविक्रमांची नोंद होऊ शकली नाही. महिलांच्या अर्धमॅरेथानमध्ये स्वाती गाढवे हिने चिंता यादव आणि मोनिका राऊत यांचे कडवे आव्हान मोडीत काढत विजेतेपदाला गवसणी घातली.
पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉन गटात राष्ट्रीय विजेता रशपाल सिंग आणि करण सिंग या दोन दिग्गज प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरस होती. पण करण सिंगने सुरुवातीलाच आघाडी घेतली आणि अखेरपर्यंत सहजपणे मजल मारत विजेतेपदावर नाव कोरले. पुण्यातील बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रूप येथे सराव करणार्या करणने 2 तास 24.26 सेकंद अशी वेळ नोंदवत विजेतेपदासह अडीच लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. मोहित याने करणला कडवी टक्कर दिली. मात्र, त्याचे जेतेपद अवघ्या सहा सेकंदांनी हुकले.
2.24.32 सेकंद अशी वेळ नोंदवणार्या मोहितला अखेर दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. राष्ट्रीय विजेत्या रशपाल सिंगने 2.27.56 सेकंद अशी वेळ नोंदवत तिसर्या क्रमांकावर मजल मारली. दुखापतीमुळे दोन वर्षांनंतर मी पहिल्या शर्यतीत उतरलो होतो. दुसर्या-तिसर्या किलोमीटरलाच अन्य स्पर्धकांना मागे टाकत मी आणि मोहितने पुढे आगेकूच केली. पण अखेरच्या क्षणी जोमाने मुसंडी मारत मी मोहितला मागे टाकत विजेतेपद पटकावले. माझ्या कामगिरीवर मी समाधानी नसलो तरी दोन वर्षांनंतर विजेतेपद पटकावल्याचा आनंद होत आहे, असे करण सिंगने सुवर्णपदक पटकावल्यानंतर सांगितले.
महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीत मुंबई मॅरेथॉनची विजेती स्वाती गाढवे हिच्यासह मोनिका राऊत, मोनिका चौधरी, मीनाक्षी पाटील यांच्यात जेतेपदासाठी चुरस पाहायला मिळाली. मात्र, रेल्वेच्या स्वातीने अनुभवाच्या जोरावर अन्य प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत 1 तास 18 मिनिटे आणि 26 सेकंद अशी कामगिरी करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. स्वातीचे वसई-विरार मॅरेथॉनचे दुसरे जेतेपद ठरले. याआधी तिने 2015 मध्ये विजेतेपद पटकावले होते. रेल्वेची चिंता यादव हिने 1.19.07 सेकंद अशी वेळ देत दुसरे स्थान तर रेल्वेच्याच मोनिका राऊतने 1.20.23 सेकंदासह तिसरे स्थान प्राप्त केले. महिला गटातील विजेतीला 1.25 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. 2015 मध्येही वसई-विरार मॅरेथॉन शर्यतीचे जेतेपद पटकावले होते. आता पुन्हा एकदा विजेतेपद मिळवल्यामुळे मी खूश आहे.