नांदगाव । मुरुड तालुक्यातील मजगाव, उसरोळी, अडाद, वेळास्ते, वाळवंटी पोफळी, दांडा व नांदगाव येथील तसेच आजूबाजूच्या गावांत भात पिकावर करपा रोगाची लागण झाली आहे. बुरशीजन्य करपा रोगामुळे भाताच्या पाकळ्यांचे दोन भाग पडून तयार होणार्या दाण्यास धोका पोहोचत असल्याच्या तक्रारी येथील शेतकरी वर्गांनी केली आहे. मुरुड तालुक्यात भातशेतीचे लागवड क्षेत्र 3900 हेकटर असून भात पीक महत्वाचे मानले जाते. यंदा एकंदर पाऊस हा मुरुड तालुक्यात 2503 मिलिमीटर एवढा बरसला आहे. मागील वर्षी हाच पाऊस मुरुड तालुक्यात 4026 एवढा पडला होता यंदा पाऊस कमी असून सुद्धा भात पीक चांगले आले असतानासुद्धा करपा रोगामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अचानक हा रोग आल्याने भात पिकाचे उत्पन्न कमी होणार अशी भीती मुरुड तालुक्यातील शेतकरी वर्गात पडली आहे. या करपारोगाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्यास शेतकर्यांच्या हातात आलेले पिक नष्ठ होऊ शकते. त्यामुळे यावर तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.
उपाययोजना करावी!
याबाबत पंचक्रोशीचे अध्यक्ष फैरोज घलटे यांनी या भागातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून करपा रोगाच्या फैलाबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. करपा रोगाचा जोराचा प्रादुर्भाव होण्याअगोदर तातडीने कृषी खात्याने उपाययोजना करावी, अशी मागणी फैरोज घलटे यांनी केली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी श्याम धर्माधिकारी यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता ते म्हणाले, भातावर करपा रोग येणे ही चिंतनीय बाब आहे. यासाठी आमच्या खात्याकडून विशेष प्रयत्न केलं जाणार आहेत. कॉपर ऑक्सिडं क्लोराईड ( सी ओ सी ) प्रती दहा लीटर पाण्यामध्ये सेपतो सायक्लीन याचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी तसेच हा रोग नियंत्रणात येईपर्यंत पिकांना कोणतेही खत देऊ नये, अशी सूचनासुद्धा यावेळी त्यांनी दिली.